Breaking News

एसटी बस अपघातात एक ठार; दुसरा जखमी

जामखेड-नान्नज रोडवरील धोंडपारगाव जवळ एसटी बस व मोटारसायकलचा अपघात होऊन मोटारसायकलस्वार महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुचाकीवरील दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावरील वाहने अडवून बसवर दगडफेक करुन बसच्या काचा फोडल्या. 

मयत महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ हे आपले जोडीदार महारुद्र कल्याण शिंदे यांचेबरोबर जामखेडहुन आपली मोटारसायकल क्र. एमएच 16 बीएल- 4733 यावरून दुपारी 2 च्या सुमारास आपल्या धोंडपारगाव या गावी निघाले होते. या दरम्यान नान्नज-जामखेड ही एसटी (एमएच 12 ईएफ 6707) ही जामखेडला जात असताना धोंडपारगावजवळ या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलवरील महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ, रा. धोंडपारगाव, जामखेड यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवरील सहप्रवासी महारूद्र कल्याण शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने जामखेड करमाळा रोडवरील वाहने अडवली, आणि अपघात घडलेल्या एसटी बसवर दगडफेक करून, बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समताच जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व लियाकत शेख यांनी आपली रूग्णवाहिका घेऊन धोंडपारगाव येथे अपघात स्थळी पोहचले, व युवराज धुमाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अपघातानंतर एसटी चालक घटनास्थळाहुन फरार झाला. याबाबत एसटी बस चालकावर गुुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेकॉ. विठ्ठल चव्हाण, पोलिस गहिनीनाथ यादव हे करत आहेत.