Breaking News

फाशीच ! जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा.

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या व राज्यासहीत देशाचे निकालाकडे लक्ष असलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे(वय 29),संतोष गोरख भवाळ(वय 29)व नितीन गोपीनाथ भैलुमे(वय 28,तिघे राहाणार कोपर्डी,तालुका कर्जत)या तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. 


दैनिक लोकमंथन च्या बातम्या तुमच्या Whatsapp गृपवर मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा


न्यायालयात निकाल जाहीर होताच कोपर्डी गावातील अनेक महिलांच्या डोळ्यात पीडित मुलीच्या आठवणीने अश्रू आले. दरम्यान मृत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 21 नोव्हेंबरला आरोपी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांच्या वकिलांनी युक्तीवाद करून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर 22 रोजी तिसरा आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड.बाळासाहेब खोपडे यांनी ही युक्तीवाद करून कमी शिक्षा देण्याची मागणी केली.

या प्रकरणी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्जल निकम यांना अतिशय प्रभावीपणे बाजू मांडतांना आरोपींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपला युक्तीवाद करतांना अ‍ॅड.निकम यांनी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी खून खटला व संसदेवरील दहशतवादी खटला या दोन्ही केसचा उल्लेख करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. सरकार पक्ष व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावण्यासाठी 29 नोव्हेंबरचा दिवस निश्‍चित केला होता. 

त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच नगर येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरासहीत नगर शहरात व कोपर्डी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन न्यायालयात लाऊडस्पीकर देखील लावण्यात आले होते. 18नोव्हेंबर (शनिवारी) न्यायालया ने तीनही आरोपींवरील आरोप सिध्द झाल्याचे स्पष्ट करीत तीनही आरोपी दोषी असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर 21 व 22 रोजी आरोपींच्या शिक्षेबाबत वकीलांनी युक्तीवाद केला. 21 नोव्हेंबर रोजी प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने अ‍ॅड. योहान मकासरे व नितीन भैलुमे चे वकील अ‍ॅड.प्रकाश आहेर यांनी शिक्षेबाबत युक्तीवाद केला. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे, अ‍ॅड.विजयालक्ष्मी खोपडे यांनी तिसरा आरोपी संतोष भवाळच्या वतीने युक्तीवाद केला. 

तीनही आरोपींच्या वकीलांनी आरोपींचे वय व त्यांची पाश्वभूमी लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली.त्यानंतर शिक्षेबाबत युक्तीवाद करतांना सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपींनी हा गुन्हा अतिशय विचारपूर्वक केलेला अतिशय गंभीर गुन्हा असल्याने तीनही आरोपींना फांशीची शिक्षा देण्याची मागणी केली. दोन्ही बाजुच्या वकीलांचा शिक्षेच्या संदर्भातील युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी 29 नोव्हेंबर रोजी निकाल देण्याचे जाहीर केले.

त्यानुसार आज न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. निकाल जाहीर झाल्यानंतर तीनही आरोपींचे चेहेरे निर्विकार होते. मात्र तिघेही अतिशय हताश झाल्याचे दिसून आले. 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 9 वी च्या वर्गात शिकणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी सायंकाळी घराजवळच असलेल्या आपल्या आजोबांकडे मसाला आणण्यासाठी गेली होती.त्यावेळी आरोपी जितेंद्र शिंदेसहीत आरोपींनी तिला रस्त्यात अडवून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केला. 

बलात्काराच्या वेळी पीडितेने ओरडू नये म्हणून आरोपींनी तिच्या तोंडात चिखल कोंबला होता.तसेच नंतर पीडित मुलीच्या शरीरावर जागोजागी चावून आरोपींनी अक्षरश: तिचे लचके तोडले होते.आरोपींचा विरोध करतांना या मुलचे दोन्ही हात अक्षरश: तुटले होते.या घटने नंतर प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता.15 जुलै रोजी पोलिसांनी प्रमुख आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याला अटक केली होती.तसेच नंतर संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोन्ही आरोपींना 16 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. 

9 वीच्या वर्गात शिकणा-या पीडित मुलीला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा होती.कोपर्डी येथील या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तसेच राज्यभर संतापाची लाट पसरली होती.कोपर्डी प्रकरणानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी लाखोंच्या संख्येने लोकांनी रस्त्यावर उतरून शांततामय मोर्चे काढून निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव शहर वकील संघाने केला होता.

त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अ‍ॅड.योहान मकासरे यांनी जितेंद्र शिंदे याचे वकीलपत्र स्वीकारले होते. सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने न्यायालयात 31 साक्षीदार व आरोपीच्या वतीने 1 साक्षीदार तपासण्यात आला.तसेच सरकार पक्षाने 24 परिस्थतीजन्य पुरावे सादर करण्यात आले होते. मृत पीडित मुलीची आई,मैत्रीण,चुलत आजी,चुलत आजोबा,दंतवैद्यकीय डॉक्टर,तपास अधिकारी व पंच यांची साक्ष महत्वाची ठरली.सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे व पुरावे तसेच सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तीनही आरोपींना शिक्षा सुनावली आहे. 

कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयाच्या आवारात 2 वेळा आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच आरोपींचे वकील अ‍ॅड.प्रकाश आहेर व अ‍ॅड.योहान मकासरे यांना फोनवरून धमकी देण्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर सुरूवातीपासूनच अतिशय संवेदनशील असलेल्या कोपर्डी प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पोलीस उप अधिक्षक अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली 2 निरीक्षक,63 कॉन्सेटबल, स्ट्रायकिंग फोर्सच्या 2 तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रवेश करणाया प्रत्येकाची तसेच वाहनांची देखील आतिशय बारकाईने तपासणी केली जात होती.तसेच कोपर्डी गावात श्रीरामपूरचे पोलीस उप अधिक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली 2 निरीक्षक,75 कॉन्सेटबल,10 महिला पोलीस,स्ट्रायकिंग फोर्सच्या 2 तुकड्या व आरसीपी ची 1 तुकडी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील हे स्वत: या बंदोबस्ताची देखरेख क रीत होते. 

जितेंद्र शिंदेला शिक्षा कलम 109 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी, कलम 376(2)अंतर्गत जन्मठेप, वीस हजारांचा दंड. कलम 302 अंतर्गत फाशी , संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे शिक्षा 109 कलमाअंतर्गत जन्मठेप व 20 हजारांचा दंड संतोष भवाळला 309 अंतर्गत फाशी नितीन भैलुमेला 302 अंतर्गत फाशी 

माझ्या छकुलीला न्याय मिळाला,पण... 

दरम्यान माझ्या छकुलीला न्याय मिळाला, पण आरोपींना फाशी मिळाली तरी माझी छकुली परत येणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली. न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली. मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते, असं निर्भयाची आई म्हणाली. प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते, असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते. न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्‍वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली. सर्व दोषींना फाशीची शिक्षा मिळाली असली तरी ते निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागू शकतात. याविषयी विचारलं असता निर्भयाची आई म्हणाली की, पहिली लढाई जिंकली आहे. पण न्यायासाठी आणि दोषींना फासावर लटकवण्याठी शेवटपर्यंत लढा देणार. यापुढे कोणत्याही छकुलीवर अत्याचार झाल्यास मी धावून जाईन. 

फाशी झाल्याने अपप्रवृत्तींना जरब बसेल : मुख्यमंत्री 

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरील विश्‍वास वाढलाय. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोपर्डीच्या निकालाबाबत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्यात आला. त्यासोबतच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली. न्यायालयातही हा खटला अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्यात आल्यामुळेच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होऊ शकली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.