Breaking News

पावसाने स्मशानभूमीची भिंत गेली वाहून

शहरातील तपनेश्‍वर रस्त्यालगत असलेल्या जामवाडी रोडवरील स्मशानभूमीची भिंत पहील्याच पावसात वाहून गेली. तसेच या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असल्याने अंत्यविधी वेळी येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.
शहरातील तपनेश्‍वर रोडवरील जामवाडी रोडवरील नगरपरिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक स्मशानभूमी आहे. सध्या अंत्यविधीच्या जागेची व बसण्यासाठी बांधलेल्या निवार्‍याची दुरावस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या सर्व बाजूने सरकारी बाभळीचे काटे व झाडे झुडपे वाढले आहेत. सध्या शहरात एकाच वेळी दोन अंत्यविधी करण्याची सोय होती, मात्र सध्या एक अंत्यविधी करण्यात येतो. या स्मशानभूमिकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. काटेरी झुडपातून नागरिकांना जावे लागते. रात्रीच्या वेळी जर अंत्यविधी करावयाचा असल्यास भाड्याने आणलेल्या गॅस बत्तीच्या उजेडात किंवा मोटार सायकलचे बल्ब सुरु ठेवून अंत्यविधी करावा लागते. यासह इतर अनेक समस्या या स्मशानभूमीत आहेत. यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही. विजेची सोय नाही. पाण्याचाही पत्ता नाही. सदरील प्रश्‍नावर एखाद्या अंत्यविधीच्या प्रसंगीच चर्चा होते. त्यानंतर हा प्रश्‍न मागे पडतो. त्यामुळेच आजही स्मशानभूमीतील असुविधा कायम आहेत. 

विशेष म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस दिवस आहेत. जामखेड शहरात 1 जून रोजी पहीलाच 83 मीमी पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने पावसाचे मोठे पाणी स्मशानभूमीत घुसले. यामुळे स्मशानभूमीची संरक्षण भिंत व काही भाग शेजारी आसलेल्या नदीत वाहुन गेला. त्यामुळे स्मशानभूमीची आणखी दुरावस्था झाली आहे. सध्या शेजारीच खासदार निधीतुन स्मशानभूचे काम सुरू आहे, ते देखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.