Breaking News

बाबा राम रहिम दोषी; पंजाब-हरियाणात झालेल्या हिंसाचारात 42 ठार

चंदीगढ, दि. 26, ऑगस्ट - साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी डेरा सच्चा चे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम सिंग यांना पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर  पंजाब-हरियाणात उसळलेल्या हिंसाचारात 42 जण ठार तर 200 हून अधिक जखमी झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी  अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमार केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात शेकडो वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान बाबा राम रहिम सिंग यांना  28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषी ठरवल्यानंतर हरियाणा पोलिसांनी त्यांची रवानगी कोठडीत केली. रोहतक तुरुंगाजवळ एक किलोमीटरपर्यंत  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत.
मे 2002 मध्ये एका साध्वीने बाबा राम रहिम यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना निनावी पत्र पाठवले होते.  या पत्राची एक प्रत पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनाही पाठवण्यात आली होती. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी हे प्रकरण पुढील  चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले होते.
बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आल्याचे कळताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले. समर्थकांनी दिल्लीत बस जाळली गेली. वृत्तवाहिनीची ओबी व्हॅनही जाळण्यात  आली. पंचकुला व सिरसा परिसरात समर्थकांनी जीवन विमा महामंडळाच्या कार्यालयाच्या इमारतीला, मानसामध्ये आयकर कार्यालयाला आग लावली. पंचकुला  परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिली. मुख्यमंत्री सिंग यांनी आपत्कालीन बैठकही  बोलावली होती. पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारकडे अहवाल मागवला आहे.
उत्तराखंड व दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सिमला महामार्गावर समर्थकांनी अनेक गाड्या फोडल्या. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी  जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.