हळगाव-चौंडी रोडवर जबरी चोरी
जामखेड ता.प्रतिनिधी
मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी जामखेड तालुक्यातील हळगाव चौंडी रोडवर चार चाकी कारला अडवून, गाडीच्या काचा फोडून मारहाण करून, गाडीतील दीड लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी तीन जणांवर जामखेड पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रविंद्र उर्फ नितीन भागवत तेरकर वय 43 रा. आघी ता. जामखेड हे दि. 16 जून रोजी जामखेड येथे मुलीच्या लग्नासाठी सामान खरेदी करण्यासाठी नातेवाईकांकडे दीड लाख रुपये ठेवले होते. या नंतर हे दीड लाख रुपये घेऊन गाडी क्रमांक एम. एच 43 आर 5727 यामधुन जामखेडहून आघीकडे चालले होते. ही कार आघी गावच्या शिवारात हळगाव चौंडी रोडवर रात्री 11:30 वाजता आली असता, पाठीमागून मोटारसायकल क्रमांक एम एच 16 -973 यावरुन आलेले आरोपी गुलाब दादासाहेब खरात, भाऊसाहेब दादासाहेब खरात, दोघे रा. खरातवाडी, पिनु अजिनाथ मोरे रा. हळगाव हे त्या ठिकाणी आले यावेळी कार अडवून कारमध्ये बसलेले फीर्यादी व ड्रायव्हर गुफुर लाला शेख यांना गाडीच्या खाली ओढुन काठीने मारहाण केली. तसेच मुलीच्या लग्नासाठी सामान खरेदी करण्यासाठी आणलेले गाडीच्या समोर डीक्कीत ठेवलेले दीड लाख रुपये रोख व फीर्यादीच्या अंगावरील दहा ग्रॅमचे सोने असा एकूण 1 लाख 84 हजार 254 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यानंतर गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडून आरोपी घटनास्थळाहुन पळुन गेले.
या घटनेनंतर फीर्यादी रविंद्र उर्फ नितीन भागवत तेरकर यांनी दि. 17 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींना विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण हे करत आहेत.
