अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार, जातेगाव घाटातील दुर्घटना
सुपा / प्रतिनिधी
नगर-पुणे हायवेवर जातेगाव घाटामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यु झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील नगर-पुणे हायवेवर जातेगाव घाटात सोमवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास बिबट्या रोड ओलांडत असताना भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराची धडक दिल्याने बिबट्याचा अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यु झाला. धडक दिलेले वाहन घटना स्थळावरुन पसार झाले. काही परिसरातील नागरिकांनी वनमजुर बंडु गोरे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वनरक्षक ए. ए. जाधव व पी एस जगताप यांना माहिती दिली. वनपाल हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्या अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने मृत झाला. बिबट्याला त्यांनी खाजगी वाहनाने पारनेर येथील वनविभागात आणले. सकाळी 8.25 वाजता एम. डी. डिंगे वनपरिषद अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली बिबट्याचे पोस्ट मार्टम करून, दहा वाजण्याच्या सुमारास वनजमिनीत बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.
जातेगांव घाटात वनजमिन मोठ्या प्रमाणात असुन, या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच वर्दळ असते. हरणांचे कळप या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत. आठ-दहा दिवसांपुर्वी परिसरातील नागरीकांना या परिसरात बिबट्या दिसला होता. पाणी व चार्याच्या शोधार्थ हरणांचा यापूर्वी अनेक वेळा मृत्यू झाला आहे. एका पाठोपाठ अनेक घटना घडत असतांना वनविभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, प्रगतशील शेतकरी अविनाश खंदारे, विशाल फटांगडे यांनी केली आहे.
