शेतकर्याच्या नजरा निरभ्र आकाशाकडे
कर्जत / सुभाष माळवे
वळवाच्या पावसानंतर मान्सूनचा पाऊस केवळ एकदा तालुक्यातील काहीच भागांमध्ये पडला. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सार्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांचा आनंद गणगणात मावेनासा झालो. मात्र, पहिल्या दिवसानंतर तब्बल बारा दिवसांपासुन पावसाने तालुक्यात दडी मारल्याने सर्वत्र पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे खरिपाचा हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेली बारा दिवसांपासुन जोरदार वारे वाहत आहे. परिणामी पावसाची शक्यता सध्यातरी दिसत नसल्याने, शेतकरी वर्गातुन चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस लांबल्याने शेतात असणारी उभी पिके, धोक्यात आली असुन, शेतकर्यांनी खरीप पेरण्यांना अद्दाप सुरूवातही केलेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. कर्जत तालुक्यातील काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन मध्यम स्वरूपाचे पाऊस झाले. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र बारा दिवसांपासुन जोरदार वारे वाहत असुन मृग नक्षत्रांतील पाऊस गायब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाअभावी शेतातील उभा ऊस, मका तसेच चारा पिके सुकून चालली आहेत. विहिरींना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हा तातडीने दमदार पाऊस पडावा या प्रतीक्षेत असल्याची आशा प्रगतशिल शेतकरी नंदकिशोर जगदाळे यांनी केली. येत्या 22 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस गायब होण्याच्या बातम्या येत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशा परिस्थितीमुळे कृषी सेवा केंद्रातील शेतकर्यांची गर्दी कमी झाल्याची माहिती सेवा केंद्र चालक दयानंद पाटील यांनी दिली. एकंदरीत सध्या सर्वत्र पाऊस केंव्हा येणार याचीच चर्चा ऐकावयास मिळत आहे. जर पाऊस लांबला तर मात्र ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची भिती आहे.
शेतकर्यांच्या आशा फोल
कर्जत तालुक्यातील अनेक शेतकरी प्रामुख्याने खरीप पिकावरच अवलंबुन आहे. यावरच आपला उदरनिर्वाह चालवतात. यावर्षी मान्सून वेळेवर येईल या आशेने शेतकर्यांनी शेतीची कामे लवकर उरकली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत.
