Breaking News

दखल - भाजपच्या नेत्यांची अक्कल गहाण

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. सत्तेनं त्यांची डोकी फिरली आहेत. वायफळ बडबड करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं या नेत्यांचं मनोबल भलतंच वाढलं आहे. वय, पद विसरून कसंही वागायचं असं त्यांचं वर्तन आहे. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायची त्यांच्यात जणू स्पर्धा लागली आहे. नागपूरचे खासदार, एका वृत्तपत्राचे संपादक राहिलेल्या आणि आता तमीळनाडूत राज्यपाल असलेल्या बनवारीलाल पुरोहित यांना महिला पत्रकाराशी कसं वागावं, हेच कळत नाही. जेव्हा प्रकरण अंगाशी आलं, तेव्हा त्यांना नात आठवली. तमीळनाडूत तीनच दिवसांपूर्वी राज्यपालांनी महिला पत्रकाराच्या गालाला हात लावून कुरवाळल्याची घटना चर्चेचा विषय ठरली होती होती. याच घटनेवर अभिनेते, संहिता लेखक आणि भाजपचे नेते एस.व्ही. ई. शेखर व्यंकटरमन यांनी एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर करून वाद ओढवून घेतला आहे. महिला पत्रकाराच्या गालाला स्पर्श केल्यानंतर राज्यपालांनीच फिनाईलनं हात धुवायला हवेत’ असं शेखर म्हणाले. त्यांच्या या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यानं सावध झालेल्या शेखर यांनी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपालांना बदनाम करण्यासाठीच संबंधित महिलेनं असे आरोप केले आहेत. मोठ्या लोकांसोबत शरीरसंबध ठेवले नाहीत, तर पत्रकार होता येत नाही. अशिक्षित आणि मूर्ख, कुरुप असलेल्या लोकांची संख्या तमीळनाडूच्या माध्यमांत जास्त आहे. ही महिला पत्रकारही त्याला अपवाद नाही, असं शेखर यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. अनेक विद्यापीठं आणि माध्यमांमध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण, कोणीही याचा जाब राज्यपालांना विचारत नाही, असा सवालही शेखर यांनी उपस्थित केला आहे.
भाजपच्या नेत्यांना महिलांची अबु्र अशी उघड्यावर आल्यासारखी दिसते. कोणीही उठावं आणि त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यावा, याला काही अर्थ नाही. परंतु, एरवी संस्कृतीचा आणि रामाचं नाव घेऊन राजकारण करणारे किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे अशा घटनांच्या माध्यमातून प्रकर्षानं पुढं आलं आहे. संत तुकारामांच्या भाषेत तर ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा अशी स्थिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एरवी मोठ्या गप्पा मारतो. चारित्र्य, हिंदू धर्माची शिकवण याविषयी गौरवानं बोलणार्‍यांना हीच शिकवण दिली आहे का, असा प्रश्‍न पडतो. संघाचा एकामागून एक स्वयंसेवक नापास होत आहे. पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चेन्नईतील पत्रकरांनी भाजपच्या मुख्यालयासमोर आंदोलन केलं. आंदोलकांनी एस.व्ही.ई.शेखर आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव एच.राजा यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे माझ्याशी संबंध आहेत असा दावा मसेक्स फॉर डिग्री’ प्रकरणातील आरोपी असलेल्या महिला प्राध्यापिकेनं केला होता. या प्रकरणात आपला काही हात नसल्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल पुरोहित यांनी बुधवारी ( 18 एप्रिल) पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत एका महिला पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर न देता त्यांनी जवळ जाऊन तिचे गाल कुरवाळले. या नंतर राज्यापालांवर टीकेची झोड उठली होती. महिला पत्रकारानं ट्विटरवरून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर राज्यपालांनी पत्र पाठवून त्यांची माफी मागितली होती. 
तू मला एक चांगला प्रश्‍न विचारलास म्हणून मी तुझे गाल कुरवाळून कौतुक केलं. तुझ्या गालाला थोपटण्याचा माझा हेतू चांगला होता. एका आजोबांप्रमाणेच मी माझ्या नातीचं कौतुक केलं, असं स्पष्टीकरण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दिलं होतं. या सर्व प्रकारावर संताप व्यक्त करत संबंधित पत्रकारानं राज्यपालांनी स्पर्श केल्यानंतर मी माझा चेहरा अनेकवेळा धुतला. पण, मी ते विसरू शकले नाही. असं ट्विट केलं होतं. पण, माफीचं पत्र पाठवल्यावर संबंधित पत्रकारानं ही राज्यपालांची माफी मागितली होती. या वादावर पडदा पडत असतानाच काम मिळवायचं असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत. एवढंच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत, या आशयाची फेसबुक पोस्ट भाजपचे नेते एस. व्ही. शेखर यांनी लिहिली आहे. त्यांनी हे अकलेचे तारे तोडणं काश्मीरमधील मंत्र्यांपेक्षा वेगळं नाही. एका आठ वर्षाच्या मुलीवर सातत्यानं बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणानंतर त्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याऐवजी आरोपींना अटक करू नये, यासाठी मंत्री रस्त्यावर येतात, हे लक्षण चांगलं नक्कीच नाही. तमीळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक तुच्छ, हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसं आहेत. त्यांचा मी आदर करतो असंही या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर तमीळनाडूतील प्रसारमाध्यमे फक्त ब्लॅकमेलिंग करणार्‍या आरोपींच्या हातात आहे असंही त्यात म्हटलं आहे. भाजपच्या नेत्याच्या अशा प्रतिक्रियेबद्दल खरं तर तमाम महिलांनी भाजपच्या विरोधात पवित्रा घ्यायला हवा. माध्यमांनीही मतभेद विसरून आवाज उठवायला हवा.