Breaking News

दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने तुला

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला व दूधाला हमीभाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठिण होत असल्याने भुमिपूत्र शेतकरी संघटना व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे आनून आंदोलन करण्यात आले. तर दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने तुला करुन शेतकर्‍यांनी जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, पिपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हंडे, दिलीप कोकाटे, संजय भोर, गणेश सुपेकर, निलेश औटी, सुनिता चव्हाण, सुनिल खोडदे, निलेश तळेकर, विश्‍वनाथ औताडे, सचिन ईरोळे, मंजाबापू वाडेकर, व्ही.के. खाडे, काशीनाथ गोके, निलेश भोर, बाळासाहेब दरेकर आदिंसह शेतकरी सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकर्‍यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर 27 रु.भाव मिळत नसून, त्यांना 17 रु. पर्यंन्तच भाव दिला जातो. दुध संकलन करणारे संघ किंवा कंपन्या भेसळ करुन एका टँकरचे तीन टँकर करुन ग्राहकांना विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवून शेतकर्‍यांच्या दुधाला भाव देखील मिळत नाही. अशा लबाडीमुळे राज्यात दुध माफिया तयार झाले असून, शेतकर्‍यांकडून दूध कमी दराने घेवून, ग्राहकांना अधिक दराने भेसळयुक्त दूध विकून संपुर्ण मलई हडप केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. दुधाळा हमी भाव न मिळता, भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्‍नाकडे दुलर्क्ष करणार्‍या दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने त्यांच्या प्रतिकात्मक दगडाची तुला यावेळी करण्यात आली.