Breaking News

आता दिल्लीत येऊन काम सुरू करा' दिल्ली भाजप अध्यक्षांचा अरविंद केजरीवाल यांना सल्ला


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता राजधानीत परत यावे आणि कामाला सुरुवात करावी, असा सल्ला दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी दिला. केजरीवाल सध्या बंगळुरूत नॅचरोपॅथीचे उपचार घेत आहेत. तिवारी यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून माध्यमांतील वृत्ताचा दाखला दिला आहे. पत्रात म्हटले आहे की, डॉक्टरांनी आता तुम्हाला तंदुरुस्त जाहीर केले आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित दिल्लीला परत यावे आणि काम सुरू करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या नाल्यांमध्ये मोठा गाळ साचला आहे, याकडे तुमचे लक्ष वेधण्याची माझी इच्छा आहे. पुढील आठवड्यात मान्सूनचे दिल्लीत आगमन होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिल्ली सरकारने नाले सफाईचे काम सुरू करण्याची गरज आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबून जनतेला त्रास होऊ नये असे वाटते. दिल्लीचे नागरिक पाणी समस्या, वीज कपात आणि प्रदूषण या समस्यांमुळेही त्रस्त आहेत, याकडेही पत्रातून केजरीवाल यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.