Breaking News

मुख्यमंत्र्यांना दूध, तूर, साखर भेट पाठवून आंदोलन शेतकरी संघर्ष समितीचे आगळे-वेगळे आंदोलन

शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केल्याप्रमाणे आज अकोले येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तूर, दूध, साखर भेट पाठवून तीव्र आंदोलन करण्यात आले. अकोले येथील तहसील कार्यालयात घोषणा देत घुसलेल्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली तूर, साखर व दुध तहसीलदारांच्या टेबलवर मांडत आंदोलनाला सुरुवात केली. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना तूर वाटत यावेळी तूर, साखर व दुध आयतीचा निषेध करण्यात आला. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव व दुधाला रास्त भावाचा हक्क यासाठी सुरु असलेल्या लढ्याला निर्णायक टप्प्यात घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेल्या, या आंदोलनासाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

देशात तूर मोठ्या प्रमाणात पडून असल्याने तुरीचे भाव कोसळले. साखर पडून असल्याने उसाचे भाव कोसळले. राज्यात दूध अतिरिक्त झाल्याने दुधाला भाव नाही. अशा परिस्थितीतही भाजप सरकार देशात परदेशातील तूर आणि साखर आयात करत आहे. राज्यात दुधाचा महापूर असताना राज्यातील सरकार राज्यात गुजरात व कर्नाटकच्या दूध कंपन्यांना पायघड्या टाकून राज्यात दुधाची आयात करत आहे. सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात संघर्ष समितीने 5 जून ते 9 जून या काळात राज्यभर तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मोझॅम्बीकची तूर, गुजरात कर्नाटक आंध्राचे दूध व पाकिस्तानची साखर भेट देत आंदोलन करण्याची हाक दिली. त्यानुसार आज अकोलेत हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असे आंदोलन होत आहे.
सरकारने आंदोलनांची दखल न घेतल्यास 7 जूनपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. अजित नवले, महेश नवले, रोहिदास धुमाळ, शांताराम गजे, खंडू वाकचौरे, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, भाऊसाहेब नवले, लालु दळवी, विलास आरोटे, राहुल वाकचौरे, विकास वाकचौरे, साहेबराव घोडे, तुळशीराम कातोरे, शंकर चोखंडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.