Breaking News

वनविभागाच्या लाल झेंडीमुळे सुरजागड लोहखनिज प्रकल्प अडचणीत

गडचिरोली, दि. 23, जून - सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिज उत्खननाची लीज मिळाल्यानंतरही वनविभागाने लाल झेंडी पुढे केल्याने जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरु पाहणारा लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीचा लोहखनिज प्रकल्प अडचणीत सापडला आहे.

महत्प्रयासानंतर शासनाने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुरजागड पहाडावरील 348 हेक्टर जमीन लोहखनिज उत्खननासाठी लीजवर दिली. प्रत्यक्षात मात्र कंपनीच्या ताब्यात प हिल्या टप्प्यात 4 हेक्टर व दुसर्‍या टप्प्यात 10 हेक्टर अशी केवळ 14 हेक्टर जमीनच देण्यात आली आहे. आणखी 10 हेक्टर जमीन ताब्यात द्यावी, यासाठी कंपनीने शासनाकडे वर्षभरापासून पाठपुरावा केला. परंतु भामरागड उपवनसरंक्षक कार्यालयाकडून विविध कारणे सांगून जमीन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी पहाडावरील लोहखनिज उत्खनन थांबले आहे. विशेष म्हणजे, लोहखनिज प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून झाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने पुढाकार घेत चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. 12 मे 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी आणि नंतर लॉयडने जवळपास 35 शेतकर्‍यांची सुमारे 50.29 हेक्टर शेतजमीन संपादित करुन त्यांना योग्य मोबदला दिला. यंदा 15 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा गडचिरोलीत आले आणि त्यांनी उर्वरित शेतकर्‍यांना धनादेशाचे वितरण केले. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकल्पाकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु वनविभाग मात्र लाल झेंडी पुढे करीत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आशा मावळेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.