Breaking News

गुणवत्ता सिद्ध करण्याचे धाडस अंगी असावे - प्रा. संजय काळे भाविनिमगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी


भाविनिमगाव प्रतिनिधी - राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श राज्यकर्त्या होत्या. समाजकल्याणाकरीता लढा देणार्‍या अहिल्यादेवी धाडसी व साहसी वृत्तीच्या शासनकर्त्या तर होत्याच परंतु स्वकर्तृत्वाने समाजरक्षण करण्यार्‍या त्या एक आदर्श राजमाता होत्या. थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या शैक्षणिक युगात वावरताना ज्ञानप्राप्तीला महत्त्व असुन प्रत्येकाच्या अंगी गुणवत्ता सिद्ध करण्याचे धाडस असावे असे प्रतिपादन प्रा. संजय काळे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथे अहिल्यादेवी व जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. काळे बोलत होते. 
या कार्यक्रमाचे सुरवातीला अहिल्यादेवी होळकर, जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संभाजी काळे होते. तर नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य कारभारी नजन, सरपंच पांडुरंग मरकड, शाम शिरसाठ, जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष संजय काळे, उपाध्यक्ष नंदकुमार शेळके, अण्णासाहेब काटे, सेवा सोसायटी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, प्रा. त्र्यंबक जाधव, ग्रामसेवक चंद्रकांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेत यश संपादित केलेल्या अविनाश तेलोरे, सुरज जाधव, साईनाथ विर या तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले तर आभार विष्णू मुंजळे यांनी व्यक्त केले. शहरटाकळी येथेही ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच अलकाबाई शिंदे. सुनील गवळी, संदीप राऊत, सुभाष बरबडे, रवींद्र मडके, संदीप गादे, सिताराम कुंडकर, अशोक निंबाळकर, विशाल गवारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.