Breaking News

उत्पादन शुल्क विभागाची चोरट्या दारू वाहतुकीवर करडी नजर

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, जून - अलिकडेच कोल्हापूर विभागाचे आयुक्त म्हणून वाय.एम. पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली,  सातारा या भागातील यंत्रणा कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत. विभागात मोठी यंत्रणा असतांनाही महामार्गावरून दारू वाहतूक मुंबईपर्यंत होते कशी, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. याच  पार्श्‍वभूमीवर बुधवारी इन्सुली तपासणी नाका कार्यालयात पाचही जिल्ह्यातील अधिका-यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सिंधुदुर्गचे अधीक्षक अतुल कानडे यांच्यासह पथकप्रमुख हजर होते.  यावेळी अधीक्षकांसह सर्व पथकप्रमुखांना पवार यांनी चांगले फैलावर घेतले. छोटा जिल्हा आणि एवढी मोठी यंत्रणा असताना जिल्ह्याबाहेर दारू वाहतूक हेते कशी, असा सवाल करत यापुढस नाक ाबंदी करण्याचे आदेश उपस्थितांना दिले. जिल्ह्याबाहेर गोवा बनावटीची वाहतूक करणारे एकही वाहन आढळता नये. तसे आढळल्यास सखोल चौकशी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी  दिल्याचे समजते.
गोवा बनावटीची दारू इतर राज्याच्या तुलनेत स्वस्त असल्याने अवैध दारू वाहतूकदारांचे मोठे रॅकेट महाराष्ट्राच्या कानाकोप-यापासून गुजरात, मध्यप्रदेशसह अनेक भागात दारुची वाहतूक करते.  एखादा नवीन अधिकारी आला की केवळ आपली ओळख होण्यासाठी चार-आठ दिवस दोन-तीन मोठया कारवाया करतो. त्यानंतर बदली होईपर्यंत कारवाईबाबत भूमिका मवाळच असते. गोवा बा ॅर्डर असलेला हा जिल्हा एवढी मोठी यंत्रणा असतांनाही केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई करतांना दिसतो.
जिल्ह्याबाहेर दारू वाहतूक होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागातील विशेष पथके जिह्यात नेहमी कार्यरत असतात. यातील काही पथके तर केवळ  आरोंदा, इन्सुली, दाणोली या भागातच कार्यरत दिसतात. जिल्ह्यात दारू फक्त सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमाभागातून येत असते. केवळ या ठिकाणी असलेले मार्ग 24 तास  रोखून धरल्यास जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुचा एकही थेंब येणार नाही. शासनाचा या जिह्यातील पथकावर मोठा खर्च होत असतांना केवळ पाटया टाकण्याचे काम बाहेरील जिल्ह्यातील पथके  करतात. या पथकाकडून कोणतीच कारवाई होत नसेल तर यातील एक निरीक्षक, दोन-तीन कर्मचारी, चालक आणि वाहन याचा विनाकारण भुर्दंड का, असा सवाल पुढे येत आहे.
इन्सुली तपासणी नाक्यावरील कार्यालयात जिल्हा आणि जिल्हयाबाहेरील अधिका-यांच्या 15 गाडया अचानक दाखल झाल्या. या दरम्यान बैठकीदरम्यान पत्रकारांनीही आत जाण्याचा प्रयत्न केला.  मात्र, स्थानिक अधिका-यांना महत्वाची बैठक असल्याचे सांगत आता भेट होणार नाही, असे सांगितले. मात्र, दुपारी दोनच्या सुमारासही बैठक सुरू होती. तेव्हाही आयुक्तांना भेटायला दिले नाही.  सायंकाळी चारच्या सुमारास बैठक संपल्यानंतर खुद्द आयुक्तही एका पथकासोबत बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.