काश्मीरमध्ये शस्त्रसंधी मागे ‘ऑपरेशन ऑलआऊट’ पुन्हा सुरु
नवी दिल्ली : रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेली शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता भारतीय सैन्याचं ’ऑपरेशन ऑलआऊट’ आता पुन्हा एकदा सुरु होणार आहे. शस्त्रसंधीच्या काळात भारतीय सैन्यावर ग्रेनेड हल्ले वाढले. तसेच दहशतवाद्यांच्या कारवायांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ईदनंतर शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शस्त्रसंधी मागे घेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व आघाड्यांवर कृती करण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. रमजान सणाला हिंसाचाराचे गालबोट लागू नये, यासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाविषयी माहिती दिली. सरकारच्या निर्णयानंतरही दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच होत्या. सामान्य नागरिकांसह, सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. अनंतनाग जिल्ह्यातील जंगलाट मंडी भागात दगडफेकीची घटना घडली. स्थानिक युवक आणि सुरक्षारक्षक आमने-सामने आले. त्यावेळी जमावाने दगडफेकीस सुरुवात केली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधराचा वापर करावा लागला. ’रायजिंग काश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली. गुरुवारी रात्री प्रेस कॉलनी भागात ही घटना घडली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण करण्यात आलेल्या औरंगजेब या भारतीय जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली