Breaking News

दखल गुजरातमधील राजकीय भूकंप

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भाजपची सत्ता आणण्यात यश आलं. त्यासाठी त्यांना खोट्या प्रचाराचा आधार घ्यावा लागला. पाकिस्तानचा मुद्दा प्रचारात आणाव लागला. विकासाचं गुजरात मॉडेल केव्हाच मागं पडलं. शाह यांनी दीडशे जागा जिंकून येतील, असा दावा केला होता; परंतु प्रत्यक्षात शंभराच्या आतच राहावं लागलं. ज्या काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली, नेतृत्व नव्हतं, त्या काँग्रेसनं चांगल्या जागा मिळविल्या. सत्ता मिळाल्यानंतरही भाजपवर पटेल समाज नाराज झाला. आदिवासी समाज नाराज झाला. नितीन पटेल यांची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षी लपून राहिलेली नव्हती. शाह-मोदी यांनी विजय रुपानी यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.
.................................................................................................................................................
माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा रुपानी यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध होता. नितीन पटेल यांना दिलेल्या खात्यावरूनही ते नाराज होेते. शपथविधीनंतर त्यांना दिलेली छोटी खुर्ची स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. गेल्या सात महिन्यांपासून गुजरात भाजपतील अंतर्गत वाद सातत्यानं उफाळून येत आहेत. एकीकडं देशात पुन्हा मोदी यांची सत्ता यावी, म्हणून प्रयत्न होत असताना स्वराज्यातच बंडाळी उफाळून आली आहे. मोदी-शाह यांचा दरारा पूर्वीप्रमाणं राहिलेला नाही, याचं हे द्योतक आहे. मंत्रिपद स्वीकारायला नितीन पटेल यांनी जेव्हा नकार दिला, तेव्हाही त्यांना मनाप्रमाणं खातं देण्यासाठी शाह यांनाच हस्तक्षेप करावा लागला होता. आताही रुपानी परदेशात गेल्यानंतर त्यांनी प्रभारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाकडंही न दिल्यानं गुजरात भाजपमधील बंडाळी अधिक उफाळली आहे. रुपानी परदेशात असताना त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
एकीकडं शाह पश्‍चिम बंगालमध्ये जाऊन तृणमूल काँग्रेसला उखडून टाकण्याची भाषा बोलत आहेत. 25 जागा भाजपला जिंकून देण्याची डरकाळी फोडत आहेत, दुसरीकडं मात्र त्यांच्याच राज्यात लोकसभेच्या पूर्वीच्याच जागा टिकतील, की नाही, असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच भाजपचे 23 आमदार बंडाच्या पवित्र्यात असून, यातील तीन आमदारांनी थेट पत्रकार परिषद घेऊन हादरा दिला आहे. भाजपमधील ही बंडाळी म्हणजे मोदी आणि शाह यांना मोठा धक्का आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कसंबसं काठावरचं बहुमत मिळालं आणि 99 आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र होतं. त्यातच मुख्यमंत्री रूपानी यांच्याविरोधात भाजप आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. वाघोडीया येथील भाजप आमदार मधु श्रीवास्तव, सावलीचे आमदार केतन इमानदार आणि मांजलपूरचे आमदार योगेश पटेल यांनी अहमदाबादेत पत्रकार परिषद घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली. राज्याच्या नेतृत्वाकडून दुर्लक्षित केले जात आहे. अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी ताटकळत ठेवलं जातं. जनतेच्या प्रश्‍नांवर सरकारी अधिकारी उत्तरं देत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करीत रूपानी यांच्याविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतला. आणखी 20 आमदार नाराज असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये राज्य भाजपनं दोन दिवसांचं चिंतन शिबीर घेतलं होतं. दोन दिवसांपूर्वी हे शिबीर बुधवारी पार पडलं. शाह हे या शिबिराला उपस्थित होतं. या शिबिरानंतर तत्काळ भाजप आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे हे विशेष. रूपानी इस्रायल दौर्‍यावर असताना हा प्रकार घडला आहे.
यापूर्वी खातेवाटपावरून पटेल यांनी मौन धारण केलं होतं. सोळंकी यांनी तर थेट भाजपला धमकी दिली होती. त्यांना आदिवासी खातं द्यावं लागलं. त्यांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांचं कौतुक केलं. तरीही भाजप काहीही करू शकला नाही. पटेल यांनी 10 आमदारांसह भाजप सोडण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचं पद देण्यासाठी चर्चा करता येऊ शकेल, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. नितीन पटेल यांच्याकडं आरोग्य व रस्ते बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती; परंतु त्यांनी ते पद स्वीकारलं नव्हतं. नितीन पटेल गेल्या 27 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत; परंतु त्यांना भाजपनं अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला. त्याची नाराजी आहे. खातेवाटपावरून पटेल यांनी तर सरकारी गाडीचा वापरही बंद केला होता. पटेल यांच्याकडून अर्थ खात्याचा प्रभार मागं घेऊन मंत्रिमंडळात पुनरागमन करणार्‍या माजी अर्थमंत्री सौरभ पटेल यांना देण्यात आलं. नगरविकास आणि पेट्रो रसायन खातं मुख्यमंत्री रुपाणींनी स्वतःकडं ठेवलं. पटेल यांना आरोग्य खात्याचा प्रभार पुन्हा एकदा दिला आहे. गुजरातसारख्या श्रीमंत राज्यात आपल्या पसंतीचं अर्थमंत्रालय न मिळाल्यानं नाराज झालेल्या नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली असली, तरी त्यांचं खरं उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हेच असल्याचं सांगितलं जाते. शाह यांनी समजूत काढल्यावर व नंतर मोदी यांचा दूरध्वनी गेल्यावर पटेल यांनी तलवार म्यान केल्याचं समजतं. किंबहुना गुजरातच्या सत्तेची चावी हाती असणार्‍या पटेल समुदायाची नाराजी कायम असण्याच्या काळात मोदी यांना 2019 च्या लोकसभेच्या परीक्षेपूर्वी आज ना उद्या पटेल यांच्यासारखा निष्ठावंत व अनुभवी चेहरा गुजरातेत आणणं भागच पडणार असल्याचं भाजप सूत्रांचं म्हणणं आहे.
नितीन पटेल यांचा सौम्य स्वभाव ओळखणारे भाजप नेते ते बंड वगैरे करतील, यावर अजूनही विश्‍वास ठेवत नाहीत, त्यामुळेच पटेल हे काँग्रेसमध्ये सामील होणार वगैरे अफवांवर खुद्द त्या पक्षाच्या गुजरातेतील नेत्यांना हसू आवरलं नसणार, असा दावा एका पक्षनेत्यानं केला. भाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार मोदी यांच्यानंतर पटेल हेच खर्‍या अर्थानं मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, तरीही त्यांच्यापासून गेली पावणेचार वर्षे ते पद दूर पळत राहिले व त्यांनीही याबाबत जाहीर वाच्यता केली नाही. मोदी व पटेल यांच्यातील संवादही उत्तम या धर्तीचा आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या वादात पदाची सूत्रे घेतली नाहीत, तरी रूपानी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीस ते हजर राहिले होते. शहा यांची मध्यस्थी व त्यापलीकडील एका अदृश्यातील आदेशाचा परिणाम पटेल यांची नाराजी दूर होण्यात झाल्याचं सांगितलं जातं. आगामी काळात नितीन पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील व लोकसभा निवडणुका गुजरातेत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप लढवेल, अशी प्रबळ चिन्हं दिसत आहेत. त्यासाठी 23 आमदारांचं बंड असल्याचं सांगितलं जातं. गुजरात भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची बातमी समाज माध्यमांवर पसरत होती. परंतु स्वतः उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ट्विट करत ती अफवा असल्याचं म्हटलं होतं. गुजरातमधील नितीन पटेल, बाबू बोखिरिया, पुरुषोत्तम सोलंकी आणि सी.के. राउलजी यांच्यासह आणखी तीन ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं समजतं. हा गट भाजमधून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे. विद्यमान भाजप सरकारचा बहुमताचा आकडा कमी करून, सरकारविरुद्ध अविश्‍वासाचा ठराव आणायची योजना ते आखात असल्याचं दिल्लीत समजलं होतं असं त्या बातमीत व्हायरल करण्यात येत होत. त्यानंतर वेगानं हालचाली सुरू झाल्या असून नाराजांची समजूत काढण्याची जवाबदारी स्वतः रूपांनी यांना देण्यात आली आहे. बोखिरिया यांच्याशी रूपांनी यांची एक गुप्त बैठक पार पडली. राउलजी हे शंकरसिंह वाघेला गटातील एक असले, तरी त्यांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर आपला विश्‍वास व्यक्त केला आहे. याच गटातील एका नेत्याच्या माहितीप्रमाणे विद्यमान उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत सुमारे 25 आमदारांचा गट जायला तयार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून नितीन पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची लालसा लपून राहिलेली नाही. त्यामुळे गुजरातमधील या मोठ्या राजकीय हालचालींचा सुगावा काँग्रेसला लागतच त्यांनी नितीन पटेल यांच्या बंडाला हवा द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेससुद्धा गुजरातमध्ये कर्नाटक नीती वापरून सरकार पाडण्याची स्वप्नं पाहू लागली आहे.