Breaking News

बहुजनांवरील अत्याचार भिडे प्रवृत्तीची अपत्ये : अँड. पोळ


कोपरगाव शहर प्रतिनिधी

बहुजन समाजावरील अन्याय अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. सवर्ण समाजाबरोबरच इतर बांधवदेखील राजरोसपणे अन्याय करत आहेत. बहुजन समाजावरील अत्याचार हे भिडे प्रवृत्तीची अपत्ये आहेत, असे मत लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले. 

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोळ यांनी म्हटले आहे, काही दिवसांपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अट्रॉसिटी अक्ट शिथिल करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. सर्वच राजकीय पक्षांनी या निर्णयाला मूक संमती दिली. या दुर्दैवी निर्णयाने बहुजन समाजाची मागासवर्गीय समाजावर अत्याचार करण्याची भिती कमी झाली. केंद्र सरकार त्याला खतपाणी घालीत आहे. तर दुसरीकडे समाज गुण्यागोविंदाने नांदत असतांना संभाजी भिडेसारख्या प्रवृत्ती समाजामध्ये जातीय भावनेचे विष पेरत आहेत. त्यास सरकारी यंत्रणा पाठीशी घालीत आहे. हे वास्तव भीमा कोरेगाव घटनेने समोर आले आहे. 

भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य साक्षीदार पूजा सकट व रुद्रवाडी येथे मंदिर प्रवेशावरून नवदाम्पत्यासह वऱ्हाडी मंडळींना झालेली मारहाण किंवा नांदेड येथे क्रांती गुरु लहुजी साळवे यांची कमान लावली म्हणून अनुसूचित जाती मधील बांधवांनी मातंग तरुणाचा केलेला खून व असो की जळगाव जिल्ह्यातील मातंग मुलांना झालेली अमानुष मारहाण या सर्व घटनाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. सरकारमध्ये मातंग समाजाचे दिलीप कांबळे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. सामाजिक न्याय प्रस्थापित करताना कांबळे अपयशी ठरले आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.