Breaking News

आ. कोल्हे यांनी दिले नुकसान पंचनाम्याचे आदेश


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारांस प्रचंड पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. त्यात सहाशे लोकवस्तीच्या शंभर रहिवासियांना त्याचा तडाखा बसला. संजीवनी आपत्ती निवारण पथकाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी ‘रेस्क्यू आॅपरेशेन’ हाती घेऊन या नागरिकांची सुटका केली. दरम्यान, या पावसामुळेमध्ये नुकसान झालेल्या भागांची पाहणी करीत आ. कोल्हे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासकीय यंत्रणेला आदेश दिले. 

पावसामुळे गायी व वीस शेळयांना जीव गमवावा लागला. लहान मुले-मुली अचानक आलेल्या पाण्यांमुळे भयभीत झाले होते. पाण्याचा फ्लो एवढा प्रचंड होता, की आनंदवाडी येथील रहिवासीयांच्या घरात साडेपाच फुट उंच पाणी साठून वाहत होते. पावसाच्या पाण्यांमुळे बंधारा रस्ता खचला असून संसारपयोगी वस्तू ओढयांना आलेल्या पुरात वाहून गेल्या. त्यामुळे नागरिकांना गुरूवारची रात्र डोक्यावर घेत जागून काढावी लागली. दरम्यान, शुक्रवारी [दि. २२] आ. स्नेहलता कोल्हे, तहसिलदार किशोर कदम, पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, कृषि अधिकारी अशोक आढाव आणि त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळास भेट झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

आनंदवाडीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना तूर्त चांदेकसारे येथील शाळेत पुर्नवसित करण्यात आले. येथील गाळ व मृत जनावरे जेसीबीच्या सहाय्याने उचलण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे. आ. स्नेहलता कोल्हे यांनी घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिली. 

याप्रसंगी सरपंच पुनम खरात, उपसरपंच अशोक होन, संजीवनीचे संचालक संजय होन, अशोक औताडे, राजेंद्र कोळपे, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, माजी सरपंच केशव होन, किरण होन, जयद्रथ होन, आदी उपस्थित होते.