शिवाजीनगर बसस्टँडचे तात्पुरते स्थलांतर
पुणे - पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स-स्वारगेट हा मेट्रो मार्ग संपूर्ण भुयारी राहणार आहे. यातील एक मेट्रो स्थानक शिवाजीनगर बस स्थानकाखाली असेल. या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकार्यांनी दिली. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल यांच्याशी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बिज्रेश दीक्षित यांनी चर्चा केली आहे.मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर तातडीने हे स्थानक हलविण्याची गरज सध्या गरज नाही. ज्यावेळी भूमिगत स्टेशनचे काम सुरू होईल, त्यावेळी हे स्थानक स्थलांतरित करावे लागणार आहे.पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या 16 किमी मार्गात सुमारे 11 किमी एलिव्हेटेड (उन्नत) असून 5 किमी मार्ग भुयारी असेल. त्यात पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स (कृषी महाविद्यालय) हा मार्ग एलिव्हेटेड असून कृषी महाविद्यालयापासून ते स्वारगेटपर्यंत जवळपास 5 किलोमीटरचा सर्व मार्ग भुयारी असणार आहे. त्यात शिवाजीनगर, धान्य गोदाम, फडके हौद, मंडई ही स्थानके असणार आहेत. त्यात शिवाजीनगरच्या स्थानकासाठी खासगी जागेचे भूसंपादन शक्य नसल्याने या ठिकाणी असलेल्या एसटीच्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या खालील बाजूस हे स्थानक प्रस्तावित आहे.
