कृषी विभागाकडून खरीपाच्या पेरणीची जय्यत तयारी
पुणे - यंदा 2018-19 मध्ये खरीप हंगाम शेतकर्यांना चांगले उत्पादन मिळवून देणार असे सांगत, कृषी विभागाकडून खरीपाच्या पेरणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याचे सरासरी खरीप पिकांचे क्षेत्र 2 लाख 30 हजार 825 हेक्टर इतके आहे. त्यामधील गतवर्षी 2 लाख 5 हजार 737 हेक्टरवर 3 लाख 24 हजार 683 मेट्रीक टन उत्पादन काढण्यात आले. तर यावर्षी 2018-19 मध्ये 5 लाख 68 हजार 446 मेट्रीक टन उत्पादन होण्याचे अपेक्षीत असल्याचे कृषी विभागाकाडून सांगण्यात आले.जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगाम चांगला झाला आहे. सुरवातीच्या काळात पावसाने हुलकावनी दिल्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या. परंतू, यंदा पाऊस समाधानकारक असून, जुनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच 60 टक्के पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील पेरण्यांना सुरवात करावी, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, भुईमुग, खरीप तीळ, कारळा, सुर्यफुल, सोयाबीन यासह इतर खरीप गळीतधान्ये यांचे उत्पादन यावर्षी घेण्यात येणार आहे.
