पंचायत समिती उपसभापतींच्या प्रयत्नातून रस्त्याचा वाद मिटला
।संगमनेर / प्रतिनिधी।
तालुक्यातील गुंजाळवाडी येथील प्रभाग ४ आणि ५ च्या सरहद्दीवरील गुंजाळवाडी ते कृष्णा डेअरी या ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या सुमारे दिड किलोमीटर रस्त्याच्या अतिक्रमणाचा वाद चांगलाच चिघळला होता. मात्र पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या पुढाकारातून तो नुकताच सुटला. त्यामुळे रहिवाश्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गुंजाळवाडी परिसरातील या प्रभागात बहुतांशी दुग्धोत्पादक शेतकरी राहतात. दररोज सुमारे एक हजार लिटर दुधाचे उत्पादन ते करतात. मात्र दूध संकलन केंद्रापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता अतिक्रमाणे व काट्यांनी व्यापला होता. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहने ओढ्याच्या कडेला उभी करुन प्रत्येकाला पायी ये-जा प्रवास करावी लागत होती. या दीड किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्याचा हा वाद मिटला.
या परिसरातील सुमारे ४० कुटुंबाचा प्रश्न मिटल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अरगडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सरपंच वंदना गुंजाळ, शांताराम अरगडे, अमोल गुंजाळ, विलास गुंजाळ, पोपट अरगडे, संजय राहणे, मारुती शिंदे, हरी राहणे, रामराव गुंजाळ आदी उपस्थित होते.
