Breaking News

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


।संगमनेर/प्रतिनिधी।
दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या धडकेत सदर दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज {दि. २८} सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडगाव ते निमगाव पागा रस्त्यालगतच्या खांडेश्वर मंदिराजवळ घडलेल्या या अपघातप्रकरणी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या खबरेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक कारभारी चव्हाण (रा. पेमगिरी) असे या अपघातातील ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

तालुक्यातील पेमगिरी येथील रहिवासी असलेले अशोक चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून संगमनेरहून पेमगिरीकडे खांडगाव-निमगाव रस्त्याने जात होते. तेवढ्यात खांडेश्वर मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात कारने जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. 

घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी चव्हाण यांना उपचारार्थ घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चव्हाण यांच्या अपघाती निधनाने पेमगिरी गावावर शोककळा पसरली आहे.