Breaking News

शासनाच्या निर्णयाने शिंगणापुरात दिवाळी! कार्यकर्त्यांनी घातला अभिषेक

सोनई प्रतिनिधी  - राज्यातील सिद्धीविनायक, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदीराच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने आज {दि. २० } मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात दिवाळी साजरी करण्यात आली. या निर्णयाच्या स्वागतार्ह सर्वश्री सरपंच बाळासाहेब बानकर, सचिन देसरडा, नितीन दिनकर, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, सयाराम बानकर आदींनी शनिमंदिरात अभिषेक घातला. 

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाची वृत्त शनिशिंणापूर येथे धडकले. या निणर्याचे गावकर्‍यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी गावकर्‍यांनी एकमेकांना पेढे भरविले. फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष केला. शनिशिंगणापूर देवस्थानची १९६३ सालची गावमर्यादित घटना राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे संपुष्टात आली. राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेतल्याने पुढील प्रक्रिया एक दोन महिन्यांत पूर्ण होईल. राज्य सरकार नियुक्त करणारे विश्वस्त मंडळ यापुढे या देवस्थानचा कारभार पाहणार आहे. दरम्यान, या निर्णयाने अनेकांना धक्का तर काहींना आनंद झाल्याचे दिसून आले. 
सन २०१६ रोजी नवीन विश्‍वस्त मंडळ विरोधात ग्रामपंचायत शनिशिंगणापूर यांनी ग्रमसभेत देवस्थान बरखास्त करण्याचे ठराव करण्यात आले होते. जुलै २०१७ मध्ये आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करुन देवस्थानचा गैरव्यवहार उजेडात आणला. त्यावेळी राज्य सरकारने एक समिती नेमून चौकशी केली. या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत देवस्थान ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, तालुक्याचे विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे हे कॅनडा येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी गेले असल्याने त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

चौकट

**

गावात आर्थिक सुबत्ता नांदेल! 

स्वच्छ, पारदर्शी आणि कार्यक्षम कारभारासाठी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय धाडसी आणि ग्रामस्थ त्याचप्रमाणे शनिभक्तांसाठी स्वागतार्ह आहे. यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी येऊन विकासकामे मार्गी लागतील. भाविकांच्या गर्दीत वाढ होऊन गावात आर्थिक सुबत्ता नांदेल. 

सयाराम बानकर, माजी विश्वस्त, शिंगणापूर देवस्थान, 

**

सरपंच पदसिद्ध अध्यक्ष हवा 

या निर्णयामुळे शिंगणापूर गावचा आणि देवस्थानचा झपाट्याने विकास होईल. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास येतील. शासनाच्या नूतन विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांना प्राध्यान्य देण्यात यायला हवे. त्यासाठी गावचा सरपंच या देवस्थानचा पदसिद्ध अध्यक्ष असावा, अशी घटनेत तरतूद करायला हवी. 

संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शिंगणापूर बचाव कृती समिती. 

** 
शनिमहाराजांच्या भक्तांना मुक्ती मिळाली
राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. यामध्ये गावकर्‍यांची कुठलीही अडचण येणार नाही. पूर्वीचे विश्‍वत हे नामधारी होते. त्यांना विचारले तर ते आमच्या हातात काही नाही असे सांगत होते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे येथील विकास व भाविकांच्या सुविधा पूर्ण होतील. मागील विश्‍वस्त निवडीमध्ये राजकीय दबावापोटी सौदेबाजी करुन नेमणूक झाल्या. मात्र आज खर्‍या अर्थाने शनिमहाराजांच्या भक्तांना मुक्ती मिळाली.

बाळासाहेब बोरुडे, शिंगणापूर.

**

विश्वस्त मंडळाने काहीच केले नाही का?
दुदैव निर्णय असून राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेऊन पक्षीय राजकारण केले आहे. सण १९६३, १९९२, २००५ या तीन वेळेस धर्मादाय आयुक्तांकडून घटनेला मुदतवाढ दिली गेली. देवस्थानकडे १४ खणांचे सभामंडप होते. आज करोडो रुपये खर्चाच्या इमारती झाल्या. सन १९९५ पर्यंत ४० गुंठे जमीन होती. आज देवस्थानकडे शेकडो एकर आहे. मग विश्वस्त मंडळाने काहीच केले नाही का? 

नानासाहेब बानकर, विद्यमान उपाध्यक्ष. 
**

‘कही ख़ुशी काही गम’
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत असून भविष्यात सुविधा निर्माण होतील. या निर्णयामुळे स्थानिक गावची घटना संपुष्टात आली असली तरी विश्वस्त मंडळात स्थानिकांना संधी द्यावी. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ‘कही ख़ुशी काही गम’ असे वातावरण आहे. 

सयाजी शेटे, गावकरी. 

**
सरकारचे धोरणात्मक पाऊल
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. या देवस्थानमध्ये सुरु असलेला गैरव्यवहार यामुळे बंद होईल. शनिमहाराजांनीच राज्य सरकारला सुदबुध्दी दिली. स्थानिक ग्रामस्थ या नात्याने मी या देवस्थानच्या गैरकारभाराविरोधात पुणे, मुंबई येथे पुराव्यानिशी तक्रारी दाखल केल्या. धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कारवाई केली नाही तरी सरकारने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. 

दादा घायाळ, गावकरी.