राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे संविधान बचाव आंदोलन तहसीलदार कदम यांना दिले निवेदन
कोपरगाव ता. प्रतिनिधी
देशाची अखंडता व एकता जोपासणारे आदर्श संविधान देशाच्या आणि राज्याच्या सरकारमधील काही मंत्र्यांना, काही खासदार व आमदारांना सत्तेची गुर्मी असल्यामुळे बदलावेसे वाटत आहे. या व्यक्तींनी संविधान बदल मोहिम सुरु केली आहे, असा आरोप करीत या भूमिकेच्या विरोधात कोपरगाव तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सत्ताधारी मंत्र्यांच्या व खासदार, आमदारांच्या निषेधार्थ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भारताचे थोर सुपुत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श संविधानामुळे सर्व जाती धर्माचे लोक आज गुण्या गोविंदाने राहत आहे. सर्वजाती धर्माच्या नागरिकांना समानतेची वागणूक मिळत असतांना सरकारमधील काही विघ्नसंतोषी मंत्री, खासदार, आमदार यांना आपल्या देशाच्या आदर्श संविधानामध्ये बदल करायचा आहे. अशा देशविघातकी विचारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. आदर्श संविधानामध्ये कोणताही बदल होऊ देवू नये व सरकारने या बाबत गांभीर्याने दखल घेवून संविधान वाचविण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, मायादेवी खरे, राजवी नेहरे, श्वेता साळुंके, रत्ना चांदगुडे, शीतल लोंढे, माधवी वढणे, भारती रुईकर, सोनाली गंगूले, सारिका देवळालीकर, अश्विनी आढाव, विद्या कहार, मनीषा कहार, आशा लकारे, पूजा कहार, मनीषा गंगूले, निशा सरोदे, मनीषा लकारे, अनिता लाचुरे आदी महिलांसह शहराध्यक्ष सुनील गंगुले, सुनील शिलेदार, राजेंद्र आभाळे, बापू वढणे, वाल्मिक लाहीरे, गणेश लकारे, मुकुंद इंगळे, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, रघु मोरे, रावसाहेब साठे, सागर लकारे, धनंजय कहार, स्वप्नील पवार, बाला गंगुले, बाळासाहेब सोनटक्के आदी उपस्थित होते.
