Breaking News

फुंडकरांना साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

अकोला, दि. 02, जून - शेतकर्‍यांच्या न्याय-हक्कासाठी गेल्या 40 वर्षांपासून झटणारे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना वर्‍हाडकरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये शुक्रवार (ता.एक) शोकाकूल वातावरण भाऊसाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला. 

राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे गुरुवारी (ता.31) पहाटे मुंबई येथे निधन झाले. सायंकाळी त्यांचे पार्थिव खामगाव येथे आणण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी शोकाकूल कार्यकर्ते व चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी भाऊसाहेब फुंडकर यांच्या वसुंधरा या निवासस्थानावरून हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने अंत्ययात्रा जात असताना अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. अत्यंत शोकाकूल वातावरणात भाऊसाहेब फुंडकर यांना निरोप देण्यात आला. 
यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, खासदार संजय धोत्रे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार रामदास आंबटकर, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते.