जखमी चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या येथील शाम कैलास चव्हाण याचा उपचारादरम्यान आज {दि. १० } दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी सचिन साटोटे याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी निलेश चव्हाण याने फिर्याद दिली.
शहरात शुक्रवारी {दि. ८} रात्री एक ते दिडच्या दरम्यान शनीमंदिर, भगवा चौक, गांधीनगर येथे येथील शाम कैलास चव्हाण आणि सचिन उर्फ जंगल्या गणेश साटोटे यांच्यात मारामारीची झाली होती. यात जखमी झालेल्या शाम चव्हाण याला साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असतांना आज {दि. १०} दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कोपरगाव शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गांधीनगर भाग अतिसंवेदनशील असल्याने नागरिकांनी दुकाने बंद केली. या घटनेचे वृत्त पोलिसांना समजताच चव्हाण याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
