Breaking News

शिक्षक संघटनांच्या पाठिंब्याने प्रा संदीप बेडसेंचे पारडे जड

नाशिक:- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची द्वैवार्षिक निवडणूक येत्या 25 जून रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी या शिक्षकांच्या राज्यातील सर्वात शक्तिशाली संघटनेतर्फे प्रा. संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टीडीएफ ची उमेदवारी आणि त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा सोबतच विभागातील जवळपास सर्वच शिक्षक संघटनांचा पाठिंबा यामुळे प्रा. संदीप बेडसे यांचे पारडे जड होत चालले आहे.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच टीडीएफ ही शिक्षकांची राज्यातील सर्वाधिक शक्तीशाली संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. तात्या सुळे व त्यानंतर आलेल्या सर्वच प्रमुखांनी शिक्षकांना इतर कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीपासून सुरू केलेला लढा शिक्षण क्षेत्रात सुबत्ता निर्माण करण्यासाठी मोलाचा ठरला. या संघटनेचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. यामुळेच सन 1964 च्या पहिल्या शिक्षक आमदार निवडणूकीपासून शिक्षक आमदार म्हणून टीडीएफचेच उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या वेळी टीडीएफचे उमेदवार निवडून आले नसले तरी विद्यमान आ. अपूर्व हिरे यांना टीडीएफ मधील अंतर्गत बंडाळीमुळेच विजय प्राप्त करता आला, हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. त्यातच गेले दोन वर्षे प्रा. संदीप बेडसे यांनी टीडीएफमध्ये निर्माण झालेली दुफळी दूर करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. त्यामुळेच आज टीडीएफच्या व्यासपीठावर हयात असलेले सगळेच माजी आमदार उपस्थित राहून प्रचार कार्यात सक्रिय सहभागी होत आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रावर वरचष्मा असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांनीही नुकताच प्रा. संदीप बेडसे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आपल्या उत्कृष्ठ संघटन कौशल्याच्या बळावर प्रा. संदीप बेडसे यांनी नाशिक विभागात कार्यरत असलेल्या जवळपास सर्वच शिक्षक संघटनांना एकाच व्यासपीठावर आणण्याची कि मया साधली आहे. शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, स्वाभिमानी शिक्षक संघटना, संस्थाचालक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, वरीष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (मूकटो पुकतो), कलाध्यापक संघ, आश्रमिय शिक्षक संघ, आयटीआय नीदेशक संघटना, क्रीडा शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि जुनी पेन्शन हक्क संघटना यासारख्या विभागातील साधारणपणे 100 टक्के शिक्षक संघटना या निवडणुकीत प्रा. संदीप बेडसे यांच्या पाठिशी उभ्या ठाकल्या आहेत. या सर्व संघटनांचे पदाधिकारी कामाला लागलेले दिसत आहेत. यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिक्षक भारती पुरस्कृत टीडीएफ चे उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांचे पारडे जड झाले आहे.