Breaking News

अग्रलेख - भाजपाचे मित्रपक्ष प्रेम !

केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपाला मित्रपक्षांची गरज वाटू लागली नव्हती, कारण भाजप मित्रपक्षांना डावलून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मित्रपक्षांची कोंडी करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नव्हते. मात्र या चार वषर्त्तत प्रादेशिक पक्षांचे होणारे खच्चीकरण पाहून अनेक प्रादेशिक पक्ष भाजपापासून दुरावण्यास सुरूवात झाली. त्याची सुरूवात तेलगू देसम या पक्षापासून झत्तली. आंध्रला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगु देसम ने भाजपाची साथ सोडली, असे जरी दिसून येत असले, तरी यामागील प्रमुख कारण म्हणजे, आंध्रात चंद्रबाबू नायडू यांच्या प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्याचा, आणि भाजपची शक्ती वाढविण्याचा डाव भाजपाचा होता. त्यामुळे आपली सद्दी संपविण्याऐवजी भाजप विरोधातच प्रचाराची आघाडी उघडण्यास काय हरकत आहे? हा विचार करूनच तेलगु देसम बाहेर पडला. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील शिवसेनेने देखील कायम आव्हानाची भाषा कायम ठेवल्यामुळे भाजपची आता गोची होतांना दिसून येत आहे. एकेकाळी प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करण्यासाठी भाजपाने दोन पावले पुढे टाकले होते, मात्र भाजपचे विकासाकडे होणारे दुर्लक्ष, रोजगार, कृषी, आर्थिक क्षेत्रात भाजपाची कामगिरी खालावत चालली आहे, परिणामी भाजपाची व्होट बँक देखील खिळखिळी व्हायला सुरूवात झाली आहे. यासाठी भाजपाकडून पुन्हा एकदा मित्रपक्षांना कुरवाळयाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे, भाजपध्यक्ष अमित शाह यांची मातोश्रीवारी. सत्तेत असून देखील शिवसेनेने भाजपाला नेहमीच आव्हानाची भाषा कायम ठेवली आहे. भाजपवर जहरी टीका करण्याची एकही संधी सेनेने सोडली नाही. त्यामुळे भाजप-सेनेचे ताणलेले संबध, आणि भाजपाचा घटता जनाधार, अशा स्थितीत या भेेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेने नेहमीच स्वबळावर लढण्याची भाषा कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे अमित शाह यांची भेट घेण्याचे देखील ठरवले आहे. अमित शाह आणि उध्दव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते? हे काही तासांत स्पष्ट होईलच. मात्र भाजपला मित्रपक्षांची गरज पुन्हा जाणवू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. एकेकाळी मातोश्रीचा दरारा होता. मात्र आता तो दरारा राहिला नाही. शिवसेनेच्या गळचेपी भूमिकेमुळे, सेनेची आत्ता खिल्ली उडवण्यात येत आहे. सेनेचा तो स्वाभीमानी बाणा आता दिसून येत नाही. तसेच सेना जरी स्वबळावर लढण्याची भाषा करत असली, तरी सेनेच्या आमदार आणि खासदारांचा मागील चार वर्षांचा रिर्पोट म्हणावा तसा चांगला नाही. अशावेळेस सेना जर स्वबळाव लढली, तर फटका सेनेला बसणार आहे. मागील वर्षांतील काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची परिस्थिती पाहता दोन्ही पक्ष, जागा वाटपांचे कमी जास्त करून आघाडी करून निवडणूकांना सामौरे जातील यात शंका नाही, कारण दोन्ही पक्षांना आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आघाडीची गरज वाटत आहे. तर दुसरीकडे भाजप-सेना स्वबळावर वेगवेगळया लढल्या, तर त्याचा फायदा काँगे्रस-राष्ट्रवादीला होईल. त्यामुळे भाजप सेनेला जवळ करू इच्छितो. लोकसभेला निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. यानिमित्ताने देशभरात मोदी विरोधक एकवटतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाने सजग होत, पुन्हा एकदा मित्रपक्षांना आदरांचे स्थान देत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे.