Breaking News

मोहोज देवढे येथे डुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी वारंवार होणार्‍या हल्ल्यांमुळे परिसरात भितीचे वातावरण

पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील शेतकरी महादेव गर्जे हे शेतात शेळ्या चारत असताना त्यांच्यावर डुकराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शेजारील वस्त्यांवरील दोन कुत्री ऐनवेळी त्यांच्या मदतीला धावून आल्याने डुकराने काढता पाय घेतला. त्यामुळे गर्जे बालंबाल बचावले असले तरी डुकरांच्या शेतकर्‍यांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे मोहोज देवढे येथील शिवारात डुकरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
डुकरांचा प्रश्‍न फक्त या गावापुरताच मर्यादित राहिला नसून संपूर्ण तालुक्यात हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पुर्वी फक्त पिकांच्या नासाडीपुरताच असलेला डुकरांचा उपद्रव आता शेतकर्‍यांच्या जीवावर बेतला असल्याने या प्रश्‍नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावणे अत्यंतिक गरजेचे झाले असल्याचे गर्जे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून समोर आले आहे. काही काळापुर्वी मर्यादित असलेल्या डुकरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मुबलक प्रमाणात आहार मिळत असल्यामुळे डुकरे प्रचंड पोसली आहेत. त्यामुळे मदोन्मत्त होऊन ती आता बेलाशकपणे माणसांवरही हल्ले करू लागली आहेत.

हातातोंडाला आलेल्या पिकांची स्वतःच्या डोळ्यांसमोर होत असलेली नासाडी पाहण्याचे दुर्भाग्य शेतकर्‍यांच्या वाट्याला गेल्या चार-पाच वर्षांपासून येत असून आता तर शेतात जाणेसुद्धा जिकीरीचे झाले आहेत. कळपाने राहात असल्यामुळे एकट्यादुकट्या शेतकर्‍याला त्यांना शेताबाहेर हुसकणे अशक्य होत आहे. त्याकरिता वनविभागाने या प्रश्‍नाला गांभिर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना अवलंबिने गरजेचे आहे. अन्यथा हा प्रश्‍न हाताबाहेर जाऊ शकतो. डुकरांबरोबर हरिणांचीही संख्या प्रचंड वाढली असून दररोज एक शेत फस्त करीत आहेत. या समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून सरकार, निसर्ग, किडी, बनावट बियाणे, व्यापारी या नतद्रष्ट साखळीत वन्यप्राण्यांच्या नव्या कडीची भर पडली असल्याने बळीराजा आता खरोखर बळीचा बकरा बनला आहे.