Breaking News

ट्रॅव्हल्सचे कार्यालय फोडून अडीच लाख लंपास

सांगली, दि. 01 - सांगलीत स्टँड रोडवरील ट्रॅव्हल्स एजन्सीतून तब्बल अडीच लाखाची रोकड चोरट्यांनी सहजपणे लांबवली. या घटनेने ट्रॅव्हल्स व्यावसायिकात  खळबळ उडाली आहे. रात्रीची गस्त, नाकाबंदी सारख्या उपाययोजना राबवूनही चोरट्यांनी आपले चोरीचे सत्र जारी ठेवले आहे.
बापट बाल विद्यालयाजवळ एम.बी.लिंक टुरिस्ट नांवाचे ट्रॅव्हल्स एजन्सीचे कार्यालय आहे. काल रात्री उशिरा कार्यालय बंद करण्यात आले. दिवसभरातील  प्रवाशांकडील प्रवासाचे, बुकींगचे म्हणून जमा झालेले 2 लाख 12 हजार 570 रुपये मॅनेजर विश्‍वास कांबळे यांनी कार्यालयातील टॉवरमध्ये ठेवले होते. त्यानंतर  त्यांनी कार्यालयाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुलूपे लावली, शिवाय अन्य एक मॅनेजर नाना माने यांनीही 40 हजाराची रोकड त्याच ड्रॉवरमध्ये ठेवली होती.
मध्यरात्री चोरट्यांनी बनावट किल्लीने कुलूपे उघडली. आत प्रवेश केला आणि 2 लाख 52 हजार 570 रुपयाची रोकड घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी आत  आल्यावर आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. आज सकाळी विश्‍वास कांबळे कार्यालय उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना रोकड लंपास झाल्याचे दिसून आले.  पोलिसात त्यांनी फिर्याद नोंद केली.