Breaking News

पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित ‘व्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन इंडिया’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थित होते.


देशामध्ये येणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास ५१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. सकल राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा २२ टक्के आहे तर देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे ३० टक्के योगदान आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सकडे नेण्याचे सुनियोजित प्रयत्न करण्यात येत असून राज्याचा विकास दर ९ ते १० टक्क्यांदरम्यान आहे.