Breaking News

रत्नागिरी येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार



नवी दिल्ली : रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

अशी असणार भागीदारी
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.