Breaking News

नाशिक पोलीस कसोटीला उतरले, भिडेंच्या नजरेत महाराष्ट्र सर्वाधिक दारूडा


नाशिक/प्रतिनिधी :
देशात निर्माण झालेले अस्थिर सामाजिक वातावरण, भिमा कोरेगाव दंगलीची धुमसत असलेले समाज मन आणि या अस्थिर वातावरणाला धुनी देऊ शकणारे मनोहर भिडे गुरूजींचे विचार पसरविण्यासाठी शिव प्रतिष्ठान संघटनेची धडपड, या धडपडीला रोखण्यासाठी पुरोगामी संघटनांचा खटाटोप या पार्श्‍वभूमीवर शहरात तणावपुर्ण परिस्थिती असतांनाही शहर पोलीसांनी अत्यंत संयमाने मनोहर भिडे यांचा नाशिक दौरा हाताळल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र चोख पोलीस बंदोबस्त आणि सतर्कता बाळगूनही एका बसवर पेट्रोल बाँब टाकून बस जाळण्याचा आणि दगडफेक करून मेडीकलचे दुकान आणि आणखी एक बस फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.
अहमदनगर नंतर नाशिक दौर्‍यावर आलेले मनोहर भिडे यांना सभा घेण्यास मज्जाव करावा अशी मागणी फेटाळल्यानंतर शहरातील काही पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी जाऊन निषेध करण्याची व्युहरचना तयार केली होती. तथापी शहर पोलीसांना या व्युहनितीची कुणकुण लागल्यानंतर शहरभर आंदोलकांची नाकाबंदी करण्याची रणनिती पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे यांनी आखली. आंदोलकांनी शिवाजीरोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर एकत्र येऊन घोषणाबाजी करीत सभास्थानाच्या दिशेने कुच केले. रमाबाई आंबेडकर वस्तीगृहानजिक आंदोलकांना अडवून उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यास भिडेंना कायद्याप्रमाणे ताब्यात घेण्याचे आश्‍वासन दिले. आंदोलकांचा रोष डॉ. पाटील यांच्या शिष्टाईने कमी झाला असला तरी काही कार्यकर्त्यांनी एका बसवर पेट्रोल बाँबचा मारा करून ती जाळण्याचा खोडकरपणा केला. एका ठिकाणी बस आणि मेडीकल दुकानावर दगडफेक केल्याने बस आणि दुकानाच्या काचा फुटल्या. सामाजिक अस्थिर वातावरणात धुमसणारे समाजमन शांत करण्यात पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्क पोलीस आयुक्त, सर्व पोलीस निरिक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे शहराची शांतता अबाधित राहीली.
दुसर्‍या बाजूला आकाश भालेराव नवीन ननावरे, अनिल आठवले, प्रतिमा जाधव, संजय साबळे, दिपचंद दोंदे, प्रकाश पगारे, आबा डोके, नितीन पगारे, बिपीन मोहिते या कार्यक र्त्यांनी मनोहर भिडे विचारांचा जमेल तसा निषेध करण्याचा प्रयत्न केला.