Breaking News

झ्वेरेव्ह ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस

जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने ४-६, ७-६(७-४), २-६, ६-३, ६-३ असा पराभव कॅरेन खाचानोव्हचा करून कारकीर्दीत पहिल्यांदाच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. साडेतीन तास आणि पाचव्या सेटपर्यंत हा सामना रंगला होता. याशिवाय पुरुष एकेरीत डॉमनिक थीमने, तर महिलांच्या एकेरीत मॅडिसन कीज आणि युलिआ पुतिनसेव्हाने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.

जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या २१ वर्षीय झ्वेरेव्हने सुझाने लँग्लेन कोर्टवर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सुरुवातीला सावध खेळ केला. याचा फायदा उचलत खाचानोव्हने परतीच्या फटक्यांचा शानदार उपयोग करताना पहिला सेट अवघ्या ३५ मिनिटांत जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेव्हने जोरदार पुनरागमन करताना सामन्यात बरोबरी साधली. हा सेट झ्वेरेव्हने ट्रायब्रेकरमध्ये ७-६(७-४) असा जिंकला. तिसरा सेट जिंकून खाचानोव्हने पुन्हा आघाडी मिळवली.