शिवसेनेला एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदे मिळणार
मुंबई : येत्या 4 जुलैपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, सध्या कॅनडा आणि अमेरीकेच्या दौर्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच मंत्रिमंडळ विस्तार आणि विविध महामंडळावरील नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे समजते. नेहमीच अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत असतात मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि गेली साडे तीन वर्षे रखडलेल्या विविध महामंडळावरील नियुक्त्यांना मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामंडळावरील नियुक्त्या रखडल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे येत्या 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळावरील नियुक्त्या केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेश दौर्यावर आहेत. ते मुंबईत परतताच यावर निर्णय घेतला जाईल. पावसाळी अधिवेशनापूर्वी येत्या 25 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुका होत आहे. या निवडणूकीचा निकाल लागताच मं त्रिमंडळ आणि महामंडळावरील नियुक्त्या केल्या जातील असे समजते. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा मुंबई पदवीधर निवडणुकीतून पत्ता कट झाल्याने त्यांच्या जागी शिवसेना ज्येष्ठ आमदाराला संधी देण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदे मिळू शकतात अशीही चर्चा आहे. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कृषी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, लवकरच अधिसूचना काढून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, रखडलेल्या महामंडळ नियुक्त्या आणि वरिष्ठ आयएएस-आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे.
