Breaking News

नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी अर्थचिंतनाची काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता


नेवासाफाटा (प्रतिनिधी) श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर माऊलीच्या मंदिर प्रांगणात अधिक मासानिमित्त गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याच सुश्राव्य वाणीतून महिनाभर सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी अर्थचिंतन सोहळ्याची आळंदी येथील शांतिब्रम्ह मारोती महाराज कुर्‍हेकर बाबा यांच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली. काल्याचा आनंद हा वैकुंठावर नाही तर संत संगतीत भूतलावर त्याची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी बोलतांना मारोती महाराज कुर्‍हेकर बाबा म्हणाले की अधिक मासामध्ये केवळ परमार्थच केला पाहिजे . या अधिक मासात आपल्या सर्वांना महिनाभर ज्ञानेश्‍वरीचे अर्थचिंतन श्रवण करायला मिळाले या निमित्ताने अमृताचा वर्षाव आपल्या सर्वांवर झाला. त्यामुळे आपण सर्व श्रोते भाग्यवान असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. काल्याचा महिमा सांगतांना तेे म्हणाले की भक्ती ही प्रेमानंद देणारी असून आपल्या या भारत देशातच देवाचा अवतार झाल्याने भक्ती सुखाचा आनंद आपल्या सर्वांना उपभोगता येतो. संत संगतीतच भक्तीसुखाचा आनंद घेता येतो तो वैकुंठावर ही मिळत नाही असे ही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. काल्याच्या किर्तनाप्रसंगी त्यांनी भगवान परमात्म्याचे बाललीलांचे वर्णन केले.
यावेळी संत ज्ञानेश्‍वर मंदिर देवस्थान व नेवासकरांच्या वतीने कृतज्ञता सन्मान पत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच नगरपंचायतच्या वतीने ही शांतिब्रम्ह मारोती महाराज कुर्‍हेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच अर्थचिंतन सोहळ्याचे प्रवक्ते रामभाऊ महाराज राऊत यांना धन्यवाद देण्यात आले.
यावेळी झालेल्या काला किर्तनाप्रसंगी ज्ञानेश्‍वरी अर्थचितन सोहळ्याचे प्रवक्ते गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, मीराबाई महाराज मिरीकर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले, विश्‍वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्‍वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णाभाऊ पिसोटे, नारायण महाराज नजन, नंदकिशोर महाराज खरात, गणेशानंद महाराज, नगराध्यक्षा संगीता बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक दिनेश व्यवहारे, सचिन नागपुरे, डॉ.सचिन सांगळे, भारत डोकडे, रणजित सोनवणे, अंबादास ईरले, जालिंधर गवळी, रामकीसन तनपुरे यांच्या सह हजारो भाविक उपस्थित होते.