Breaking News

खा. सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘प्राईमटाईम फाउंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील ’आयआयटी’च्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते सुळे यांना गौरवण्यात आले. यावेळी आयआयटी मद्रासचे डायरेक्टर भास्कर राममूर्ती, ‘प्राईमटाईम फाउंडेशन’चे संस्थापक के. श्रीनिवासन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्‍वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्‍न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्‍वास ठेवणार्‍या जनतेचा आहे. हा पुरस्कार जनतेला समर्पित क रताना मला आनंद होत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार वितरणानंतर आयआयटी मद्रासमधील काही निवडक विद्यार्थ्यांनी सुळे यांच्याशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांसमोर मतदारसंघात विकास साधण्यासाठी संसदेतील प्रभावी कामगिरी कशी साहाय्यभूत ठरते, तसेच सभागृहात प्रश्‍न मांडून ते तडीस कसे न्यावेत, या विषयी एक सादरीकरणही केले. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे 9 वे वर्ष आहे. लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खासदारांना ‘प्राईमटाईम फाउंडेशन’ आणि ई-मॅगॅझीन ‘प्रिसेन्स’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.