Breaking News

देशात मुबलक शस्त्रसाठा उपलब्ध : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल करारावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी देशात शस्त्रसाठ्याचा तुटवडा नसल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या रालोआ सरकारने राफेल करारात अवाजवी दरात लढाऊ विमाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातर्फे सतत केला जात आहे. यावर उत्तर देताना सीतारामन यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले. आपण केलेला करार क्षमता, किंमत, साधने, देखभाल व प्रशिक्षणाच्या दृष्टीने उत्कृष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात शस्त्रास्त्रांचा तुटवडा असल्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितले, आम्ही सत्तेत आलो तेव्हा तुटवडा होता याविषयी संशय नाही. आज आमच्यावर रोषारोपण करणार्‍यांनी हा तुटवडा कुठून निर्माण झाला ते सांगायला हवे. संपुआ सरकारच्या काळातील काम व खर्चाची रालोआ सरकारच्या काळातील काम व खर्चाशी तुलना करताना शस्त्रसाठ्याची कमतरता भरुन काढण्यासाठी योग्य पावले उचलण्यात आली असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.