कोतवाला वाघेला आत्महत्या प्रकरणी अवैध सावकारांवर गुन्हा
सोलापूर - बेकायदा सावकाराच्या त्रासाला कंटाळून कोतवाल काशीनाथ वाघेला (वय 48, रा. नवीन वसाहत, चिंचवली रस्ता, सांगोला) यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तब्बल 20 दिवसांनी पोलिसांत पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तिपाल बनसोडे, राहुल बनसोडे, संदेश बनसोडे, आकाश सोनवणे, अप्पा होटे (सर्व रा. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आकाश व राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाघेला यांनी संशयित सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी पैशाच्या वसुलीसाठी त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात संशयित सावकारांची नावे आहेत. तरीही पोलिसांनी घटनेनंतर गुन्हा दाखल केला नाही. 20 दिवसांनी गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त होत आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.