Breaking News

राज्यभरात पावसाची संततधार मुंबईत पावसाचा पुन्हा जोर ; पाणी तुंबण्याची शक्यता

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी रात्रीपासूनच मुंबईसह राज्यात पुन्हा जोर धरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची चांगलीच उघडझाप पाहायला मिळतेय. दादर, परळ, माटुंगा आणि वरळी या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. 

रविवार असल्यामुळे या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसतायत. 
मुंबईकर अनेक दिवसांपासून चातक पक्ष्यांप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. रविवारच्या सकाळी पावसाने जोरदार सुरुवात करुन आपल्या आगमनाची वर्दी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. एरवी रविवार म्हटले की, रस्त्यावर येणार्‍या-जाणार्‍याची गर्दी, वाहनांची वर्दळ असते. पण आज सकाळी ढगाळ वातावरण आणि पडणार्‍या पावसाने रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागली की काय ? असे चित्र दिसत होते. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची उघडझाप पाहायला मिळत आहे. दादर, परळ, माटुंगा आणि वरळी या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या ठिकाणी तर पश्‍चिम उपनगरात वांद्रे, गोरेगाव, विलेपार्ले, बोरीवली या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असेच वातावरण कायम राहिले तर, मात्र मुंबईत पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण पाहून मुंबईकरांनी बाहेर पडावे.
दरम्यान, जोगेश्‍वरी परिसरात रविवारी संततधार पावसामुळे एका इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे इमारतीच्या आवारात पार्क करुन ठेवलेल्या 6 कार आणि एक दुचाकी भिंतीखाली दबून चकनाचूर झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.