Breaking News

सर्वगुणसंपन्न अशा संदीप बेडसे सारख्या उमेदवाराला निवडून देण्याची संधी दवडू नका

अद्वय हिरेंचे मालेगावच्या शिक्षक मेळाव्यात शिक्षकांना आवाहन
मालेगाव, प्रतिनिधी :
शिक्षक आमदार मतदार संघाच्या निवडणुकीत सुज्ञ, तत्पर आपल्याला सहज भेटणारा प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव असणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा असा सर्वगुण संपन्न उमेदवार पारखण्याची वेळ आली आहे. ज्यांना समाजसेवेचा वारसा लाभला आहे असा एकमेव उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आजमितीत फक्त संदीप बेडसे आहेत. तेव्हा उमेदवार पारखूनच मतदान करा, असे आवाहन आबासाहेब अद्वैय हिरे यांनी मालेगाव येथे केले.
महात्मा गांधी विद्या मंदिर शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या 25 जून रोजी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मालोगाव येथे अमेय लॉन्समध्ये भव्य असा शिक्षक मेळाव्याचे आयोजन अद्वय हिरे यांनी आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसाद बापू हिरे, माजी आमदार मौलाना मुफ्ती, उरफान अन्सारी, रियाज शेख, चंद्रकांत कुशारे, ज्वारस सर, कैलास देवरे, के . के. अहिरे, रविंद्र मोरे, एस. डी. शिरसाठ, रकीबे सर, गोरख सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या उत्स्फूर्त अशा मनोगतात हिरे पुढे म्हणाले, सर्व राजकीय पक्षाशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत, ज्ञान देणारा, ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना हक्काचा माणूस म्हणून संदीप बेडसेंशिवाय पर्याय नाही. उमेदवार निवडताना त्याचे अंतरंग, बाह्यरंग आपल्या शिक्षकांच्या अस्तित्वासाठी कोण विश्‍वासू वाटतो, त्यावर मतदान करा. 
शिक्षकांचे शैक्षणिक संस्थेचे प्रश्‍न ज्यांनी अनेक वर्षापासून प्रशासनात असताना समजून घेतले. रोखलेले विद्या वेतन संदीप दादाच्या एका प्रयत्नात आपल्याला मिळाले. तेव्हा असा तत्पर उमेदवार आपल्या भल्यासाठी आवश्यक असल्याने आपण सर्वांनी एकमुखाने संकल्प करून संदीप दादांना विजयी करू, असा भक्कम विश्‍वास हिरे यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक क्षेत्रातील दुरदृष्टीचे नेते प्रसाद बापू हिरे यांनी उमेदवारामागे वारसा पुरोगामी विचाराची शिदोरी अशा बळ देणार्‍या गोष्टी युक्त संदीप बेडसे यांच्यात आहेत. आजोबांच्या ज्ञानमार्गाचा वारसा आणि वडिलाचे शिक्षक संघटनेतील भरीव कार्य यांच्या बळावर आपल्या सर्वांसाठी विश्‍वासू उमेदवार कुणी असेल तर फक्त संदीप बेडसेच आहेत. आपला हक्काचा माणूस विजयी करण्याची संधी सोडू नका, असे आवाहन करून संस्थेच्या आणि शिक्षकांच्या वतीने जाहीर पाठींबा त्यांनी दिला.
आजच्या निवडणुकांची संकल्पना बदलली आहे. जो काम करणारा असेल, ज्यांची सामाजिक बांधिलकी आहे, तोच उमेदवार खर्‍या अर्थाने सूज्ञ आणि जाणकार मतदार पारखून मतदान करतो. आपल्याला संदीप दादा बेडसेसारखा सर्वार्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले उमेदवार लाभला आहे. त्यामुळे आपण चांगला आमदार हवा असेल तर संदीप बेडसेंना आपलं मत देऊन विजयी करा, असे मत आपल्या शिक्षक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार मौलाना मुफ्ती शेख यांनीही प्रामाणिकपणे शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संदीप दादा बेडसे हे निश्‍चितच प्रभावीपणे काम करतील असा मला विश्‍वास आहे. प्रशासनात असताना त्यांच्या कामाची आणि दीन- दलित, आदिवासी, मागास तसेच रडत असलेल्यांना मदत करून हसत पाठवणारा नेता आपल्याला लाभतो आहे, तेव्हा आमच्या अल्पसंख्यांक बांधवांचे मतदान 100 टक्के संदीप दादांना राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 
या मेळाव्यात महात्मा गांधी विद्या मंदिरचे सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि अल्पसंख्यांक शिक्षक शिक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मेळाव्यात दादांना भरभरून मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव देवरे यांनी तर आभार संजय मगर यांनी मानले.