एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल
संगमनेर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. आज {दि. ९ } दुसऱ्या दिवशीही तो सुरुच आहे. संगमनेर आगारातून आज दुपार १ वाजेपर्यंत एकही प्रवासी फेरी सुटू शकली नाही. दुपारपर्यंत १२२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. महामंडळाच्या गाड्या रस्त्यावर न उतरल्याने आणि त्यातच परवानाधारक काळी पिवळी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
खासगी वाहन चालक प्रवाशांकडून अव्वाचा सव्वा पैसे उकळत आहेत. काल पावसाने हजेरी लावल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र आज परिस्थिती त्याहून बिकट बघायला मिळाली. खाजगी वाहन चालक संगमनेर ते पुणे प्रवाशी भाडे तब्बल आठशे रुपये प्रवाशांकडून आकारात असल्याचे चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे.
संगमनेर आगरातील १३२ चालक व १२७ वाहक काल अघोषीत संपात सहभागी झाल्याने आगारातून एकही गाडी बाहेर पडली नाही. त्यामुळे एका दिवसात होणाऱ्या सर्व ५२० फेऱ्या रद्द झाल्याचे आगारप्रमुख एम. बी. सैंदाणे यांनी सांगितले. शिवसेनेच्या वाहतूक सेनेच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नसल्यामुळे ते यापासून दूर राहिले. खासगी वाहना चालक बसस्थानक परिसरात आपली वाहने उभी करून प्रवासी वाहतूक करीत होते. काही वाहनचालकांनी अधिक भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरले. कुठलाही अनुचीत प्रकार होवू नये यासाठी पोलीसांची एक तुकडी बसस्थानक परिसरात तैनात करण्यात आली होती.
