Breaking News

मुंबईत दोन दिवसात सात आत्महत्या

मुंबई - मायानगरी शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र ही ओळख आता पुसत चालली आहे. स्वतःची स्वप्न पूर्ण करताना येणार्‍या अपयशामुळे हे शहर आता आत्महत्येचे शहर बनत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. मागील काही दिवसातील घटनावरून याची प्रचिती येत आहे. केवळ दोन दिवसात मुंबईत सात जणांनी आत्महत्येचा मार्ग पतकरल्याने खळबळ माजली आहे. कफ परेड येथे पटेल कुटुंबाने स्वतःला संपवून घेतले तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी मुंबईतील बांद्रा परिसरातील शासकीय वसाहत इमारत क्रमांक 2 मध्ये 47 वर्षाचे राजेश भिंगार राहत होते. त्यांनी पत्नी अश्‍विनी, दोन मुले गोरांग आणि तुषार यांच्यासह विष प्राशन करुन आत्महत्या केली. झुरळ मारण्याचे औषध पिऊन या चौघांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी खळबळ माजली होती . पण या दोन कु टुंबियांच्या आत्महत्येमागे आलेले नैराश्य आणि आर्थिक तंगी हेच कारण असल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासातून आणि सुसाईड नोटमधून समोर आले आहे. कफ परेडमध्ये झालेल्या प्रवीण पटेल कुटुंबाच्या आत्महत्येची दुःखद कहाणी 30 पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली आहे. मुंबईत आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍या प्रवीण पटेल यांना सध्या आर्थिक संकटातून जावे लागत होते. ते राहत असलेल्या कफ परेड इथल्या मच्छिमार नगर परिसरातील चाळीत ते हलाखीचे दिवस काढीत होते. गेले 5 महिने घराचे भाडे न भरता आल्यामुळे घरमालक पैशांसाठी तगादा लावत होता. आजूबाजूचे शेजारी सुद्धा पटेल कुटुंब गरीब असल्याने त्यांना तुच्छतेने वागवत होते. 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. 
मुंबईसारख्या शहरात कित्येक लोक स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून अनेक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी येतात. पण या स्वप्नांच्या दुनियेला कधीकधी पूर्णविराम मिळतो. स्वतः धडपड आणि काबडकष्टाच्या मागावर असलेला कर्ता पुरुष मग नैराश्य आणि मानसिक तणावाखाली जातो. पण त्याच्या या बदललेल्या स्वभावाचा फटका हा कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांना बसतो. गेल्या आठवडाभरात सलग दोन दिवसात दोन कुटुंबांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.