Breaking News

देशभरात ईदचा उत्साह

नवी दिल्ली - देशभरातील मुस्लिम बांधव शुक्रवारी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करत आहेत. रमजानचा महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लाम दिनदर्शिकेमधला नववा महिना आहे. ईदच्या दिवशी लोक नवीन कपडे घालून मशिदीत जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या सणाच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि मेजवान्यांचा आस्वाद घेतला जातो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणार्‍या सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. समाजात बंधुभाव आणि सामंजस्य वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिनाच्या निमित्ताने आपल्यातील ऐक्य व समता दृढ होवो, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.