Breaking News

केवळ मातंग समाजाच्या मुलांना मारहाण पोलिसांनी खोटा पंचनामा केल्याचा कुटुंबियांचा आरोप



जळगाव : जिल्ह्यातील वाकडी येथील प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विहिरीत पोहण्यासाठी 12 ते 15 मुले असताना केवळ मातंग समाजाच्या मुलांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, 15 फूट खोल विहिरीत मुले पोहली असताना पोलिसांनी पंचनाम्यात 80 फूट खोल विहिरीत मुले पोहायला आल्याचा खोटा पंचनामा केल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वाकडी प्रकरणी शुक्रवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पोलीस सत्ताधारी भाजपचे प्यादे बनून काम करीत असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. कुटुंबावर स्थानिक मंत्र्यांचा दबाव असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 
जळगाव जिल्हा पोलिसांनी आज जामनेर तालुक्यातील वाकडी इथल्या घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ज्या विहिरीत ही मुले पोहायला गेली होती त्या विहिरीचा पंचनामा पोलिसांनी केला. या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही शुक्रवारी सकाळी वाकडी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेस एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वाकडी इथं जाऊन कुटुंबाची विचारपूस केली. दरम्यान, काँग्रेस पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे आश्‍वासनही नेत्यांनी यावेळी दिले.


काय आहे प्रकरण?
जळगावात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात राहणारी मातंग समाजाची मुलं जोशी समाजातील आरोपीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच आरोपींनी तिघांना नग्न करुन अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांची गावात धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण केली. ही घटना र विवारी दहा जून रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुं बियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.

पंचनाम्यात विहीरच बदलली 
ज्या विहिरीत पोहल्यावरून हा सगळा प्रकार घडला ती विहीरच पंचनाम्यात बदलण्यात आल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला. गावाजवळची एक विहीर पंचनाम्यात नमूद करण्यात आली. प्रत्यक्षात त्या विहिरीत पाणीच नाही, मग त्यात पोहण्याचा प्रश्‍नच येत नाही. पण पिण्याच्या पाण्याची विहिर असल्यामुळेच मुलांना मारहाण झाल्याचे यावेळी भासवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही जाब विचारल्यानंतर पोलिसांनी खर्‍या विहीरींची पंचनाम्यात नोंद केल्याचा दावा सत्तार यांनी केला. प्रसार माध्यमांमुळे या प्रकरणाला खर्‍या अर्थाने वाचा फुटली. अन्यथा हे प्रकरण दडपून टाकण्याचे पूर्ण प्रयत्न गावातील बहुसंख्य मंडळीनी केले होते. सहा दिवस या प्रकरणात पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. आता चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.