Breaking News

'मॉड्रिचचा किक 'फटका'; मेस्सीला 'दे धक्का'


क्रोएशियाची अर्जेंटिनावर ३- ० ने मात; अर्जेंटिनाचा ६० वर्षांमधील मोठा पराभव

मॉस्को वृत्तसंस्था

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनाला धक्का दिला असून ड गटातील महत्त्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनावर ३- ० ने मात केली आहे. या विजयासह क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले असून अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. क्रोएशियाने दक्षिण अमेरिकेतील टीमवर मात केल्याची ही पहिलीच वेळ असून कर्णधार लुका मॉड्रिच क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला .

या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली. अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती. उलट क्रोएशियानेच सर्वोत्तम खेळ करत अर्जेंटिनाच्या स्वप्नांवर पाणी फेरले.

अर्जेंटिनाच्या आघाडीच्या फळीला क्रोएशियाच्या बचाव फळीने उत्तम पद्धतीने रोखले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. सामन्यात गोलरक्षक विल्फ्रेडो कॅबलेरोच्या घोडचुकीनं अर्जेंटिनाचा घात केला. मध्यंतरानंतर ५३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलकिपरकडून चेंडू पास करताना चुक झाली आणि या संधीचे क्रोएशियाच्या रेबिचने फायदा घेत संघासाठी पहिला गोल मारला. या गोलमुळे सामन्याचे चित्रच बदलले. क्रोएशियाच्या संघाचा आत्मविश्वास वाढला होता. तर दुसरीकडे अर्जेंटिनासाठी हा मोठा हादराच होता. ८० व्या मिनिटाला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचने अप्रतिम गोल मारत संघाला २- ० अशी आघाडी मिळवून दिली. वर्ल्डकपमधील हा ५१ वा गोल होता. यानंतर ९१ व्या मिनिटाला इवान राकिटिकने तिसरा गोल मारला आणि अर्जेंटिनावर क्रोएशियाने ३- ० असा ऐतिहासिक विजय मिळवला.


६० वर्षांमधीलसर्वात मोठा पराभव

वर्ल्डकपमध्ये गेल्या साठ वर्षांमधील अर्जेंटिनाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी १९५८ च्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतील अर्जेंटिनाला चेकोस्लोव्हाकियाने ६- १ अशी धूळ चारली होती. आणि त्यांनतर तब्बल ६० वर्षांनी म्हणजे कालच्या सामन्यात क्रोएशियाने अर्जेंटिनावर ३- ० ने मात केली.