Breaking News

पारनेर तालुक्यात काही भागांत मुसळधार पाऊस, खरिप पिकांना जिवदान

सुपा / प्रतिनिधी । 22 ः
पारनेर तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. काही भागांत मृग नक्षत्रात पाऊस झाला होता, तेंव्हा शेतकर्‍यांनी पेरणीला घाई करून पेरणी उरकून घेतली, मात्र पुढे पाऊस गायबच झाला. कालरोजी 4 च्या सुमारास पुणेवाडी, सोबलवाडी परिसरात सायंकाळच्या 5 वा.च्या सुमारास सुपा, वाळवणे, रुईछत्रपती, वडनेर हवेली, मुंगशी, म्हसणे, पळवे, गटेवाडी या परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाने परिसर झोडपून काढला. परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. जमिनीत पाणी साचले होते. बंधारे भरले तसेच, तलावात देखील पाणी आले. पहिल्या पावसात शेतकर्‍यांनी मुग, उडिद, बाजरी, मकासह अन्य पिकांची पेरणी केली होती. पाऊस लांबल्याने मात्र दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असतांना, गुरुवारी झालेल्या हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाने या पिकांना जिवदान मिळाले आहे. पावसानेे पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने मका, बाजरी, मुग, या लाबलेल्या पेरण्या आता सुरू होतील. झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात असून, आता खरीपातील शेतीच्या कामाला पुन्हा वेग येताना पहावयास मिळणार आहे.
दरम्यान तालुक्यात अन्य भागांत पाऊस अद्याप पडला नाही. पारनेरमध्ये देखील 21 जून रोजी हलक्या सरी कोसळल्या परंतू अजुन या भागात पाऊसच झाला नसल्याने, पेरण्या झालेल्या नसून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असून, एक दोन दिवसात तालुक्यात सर्वत्र पाऊस समाधानकारक होईल असा अंदाज आहे.