एकांकीका व बालनाट्यात नाविन्यपूर्ण कल्पकता व आधुनिक तंत्रज्ञान यांची सुरेख सांगड
डोंबिवली - 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात सादर करण्यात आलेल्या एकांकीका व बालनाट्यात नाविन्यपूर्ण कल्पकता व आधुनिक तंत्रज्ञान यांची सुरेख सांगड पाहायला मिळाली. मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आलेली इतिहास गवाह है ही एकांकिका व ‘तेलेजू‘ आणि ‘जंबा बंबा बू’ ही बालनाट्ये पाहताना रसिकांकडून उत्स्फुर्तपणे भरभरुन दाद मिळाली. आपली मराठी नाट्यपरंपरा किती समृध्द व वैभवशाली आहे व ती नाट्यदिंडी पुढे नेण्यासाठी नवीन पिढीतले भोई कसे सक्षम आहेत याची जाणीव सर्वांना झाली. व्यावसायिक रंगभूमीवर अभावानेच दिसणारे भव्य नेपथ्य, त्याला शॅडो प्ले व आर्ट म्हणजे पेंटिंग्जची चपखल साथ, रंगमंचावरच संपूर्ण वाद्यवृंदासह तरुणाईला भावणारे लाईव्ह गायन, वादन व नृत्य, त्यातही अकराफूट उंच तरुणीने केलेले नृत्य, अत्यंत प्रभावी प्रकाश योजनेचा वापर, काही क्षणात बदलणारे नेपथ्य व सुमारे पन्नास कलाकारांना एका दमदार संहितेत बांधणारे दिग्दर्शकाचे क सब या सर्च आघाड्यांवर वरचढ ठरलेली व वारंवार टाळ्या व वाहवा मिळविणारी अनेक पुरस्कार प्राप्त इतिहास गवाह है ही एकांकीका बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने सादर केली.
लेखक शुभम गिजे, नेपथ्य आदित्य पवार व दिग्दर्शक रुषी मनोहर यांनी सहकार्यांच्या साथीने सिध्द केले की अशा भव्य स्वरुपात ही एकांकीकाच नव्हे तर मराठी नाटकही असे डोळे दिपवणारे व प्रेक्षकांना खिळवून ठेऊ शकते. या एकांकीके आधी नाट्य संमेलनात गुरुवारी सकाळी दोन बालनाट्ये सादर करण्यात आली. नेपाळ सारख्या निसर्ग रम्य हिंदू राष्ट्रातील मुलींना कुमारीदेवी बनवून त्यांना हसण्या बागाडण्याच्या वयात दैवत्व प्राप्त झाले असा संस्कार करुन देवी बनविण्यात येते व त्यांचे निरागस बालपणच हरवते. पण ती मुलगी वयात येताच पुन्हा घरी पाठविण्यात येते. या रुढी परंपरेवर प्रकाश टाकून सशक्त संहितेद्वारे भाष्य करत सर्व बालकरांच्या सक्षम अभिनयाने उपस्थित सर्व नाट्यरसिकांना विचार करण्यास भागा पाडणारे बालनाट्य ‘तेलेजू’ सादर केले अ.भा.नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूर यांनी. डॉ. मीरा शेंडगे यांची दमदार व नाजूक सामाजिक विषयाच्या संहितेला तितकेच वेगवेगळ्या प्रयोगशीलतेने दिग्दर्शन व संगीत होते मिहिका शेंडगे यांचे. 16 व्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व अभिनयाचे रौप्यपदक मिळविणार्या आर्या कुलकर्णी हिची अल्लड समिता या कुमारिकेची कुमारीदेवी होतानाची स्थित्यंतरे ताकदिने साकारणार्या आर्याने प्रेक्षक ांची मने जिंकली. यानंतर मुंबई कल्चरल सेंटरने सादर केले भन्नाट व जंगलबुक या लहानग्यांच्या आवडीच्या कार्टून वर आधारीत परंतू जाती धर्माच्या विळख्यात न अडकता माणूस म्हणून जगावे व सर्वांवर माणूस म्हणून प्रेम करुन वेळप्रसंगी धावून जाण्याची शिकवण देणारे ‘जंबा बंबा बू’ हे सक्षम कुलकर्णी याच्या सक्षम अशा मोगली या मध्यवर्ती भुमिकेने साकार झालेल्या व समयोचीत व सद्य परिस्थिती वर भाष्य करणार्या पंचेस व अॅडिशन्सनी हे बालनाट्य रसिकांना खूपच भावले.