Breaking News

तो मी नव्हेच म्हणणार्‍या लाचखोराला तीन दिवसाची कोठडी


डोंबिवली - लाचखोरीत तो मी नव्हेच भाषा करणारा लाचखोर संजय घरत पोलिस कोठडीची हवा खात आहे. आठ लाख रेकोर्डब्रेक लाचखोराने कल्याण डोंबिवलीच्या नावाला का ळिमा फासला अशी चर्चा शहरात गेले तीन दिवस होत आहे.
संजय घरतला अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. यामुळे त्याच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात केलेले अनेक घोटाळ्यांचे आरोपही पुन्हा एकदा चर्चेत आले होते. याच दरम्यान घरत हा 2015 साली महापालिकेत उपायुक्त असताना त्याची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नेमणूकहीवर ताशेरे ओढले जात आहेत. आजपर्यंत पालिकेतील सुमारे 27 पुरुष व महिला लाचखोर अधिकारी लाचखोरीत पकडले गेले आहेत. त्यात अधिक भर म्हणून घरतने लाचखोरीत अत्युच्च पातळी गाठली आहे.
संजय घरत आणि त्याच्यासोबत पकडण्यात आलेले लिपिक ललित आमरे, भूषण पाटील या तिघांच्याही घरावर एसीबीने छापे टाकले. या छाप्यामध्ये घरत याच्या घरातून काही महत्त्वाच्या क ागदपत्रांसह काही पालिकेच्या फाईल्सही मिळाल्या आहेत. लाच स्वीकारताना पकडलेला पालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला चौकशीनंतर अटक झाली. घरत बरोबर ललित आमरे आणि भूषण पाटील यानांही अटक करून कल्याणच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हातरटे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत आता त्याची सविस्तर चौकशी केली जाता आहे. खास सूत्रांकडून असे कळते कि, घरत चौकशी दरम्यान प्रश्‍नांची उत्तरे देत नसून मोबाईलचा पासवर्ड देण्यास टाळाटाळ करीत आहे. मोबाईलमुळे अनेक मोठी धेंडे समोर येतील अशीही शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एका वादळी महासभेत संजय घरत आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्या बडतर्फीची मागणी करण्यात आली होती. पा लिका परिक्षेत्रात वाढत्या अनधिकृत बांधकामांसाठी हे दोन अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला होता. अनधिकृत बांधकामांमुळे शहरांना आलेल्या बकाल स्थितीसाठी जबाबदार धरून या अधिकार्‍यांना पालिकेच्या सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली होती. आदी बाबीची आता पुन्हा उजळणी होत आहे.
कल्याण-डोंबिवलीत सद्य परिस्थितीत एक हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. राजरोसपणे उतुंग मजल्यांच्या अनधिकृत इमारती उभ्या राहत असतानाही प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अनधिकृत बांधकामांप्रकरणी संजय घरत याची चौकशी करण्याच्या मागणीची दखल घेऊन नगरविकास विभागाने पुढील दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून त्यासंदर्भातील अहवाल पाठवण्याचे आदेश पालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांना दिले होते.
घरत कल्याण-डोंबिवली महापालिकेत सन 1995 पासून कार्यरत असून सहाय्यक आयुक्तपदी असताना घरत याने आतापर्यंत सामान्य प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, बीएसयूपी पुनर्वसन समितीचे प्रमुख, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आदी महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार हाताळला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्र निश्‍चित करण्यास दिरंगाई अशा प्रकारचे वादग्रस्त मुद्यांमुळे घरत ओळखले जातात. असा हा लाचखोर तो मी नव्हेच असा आविर्भाव दाखवून महापालिकेत हिरो म्हणून भासविणार्‍याला आता पोलीस कोठडीची हवा चाखावी लागल्याने पेरले तसे उगवते याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होत आहे.