Breaking News

म्हसणे स्वस्त धान्य दुकान प्रकरण, दोषी आढळ्यास कारवाई करणार ः तहसीलदार सागरे


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील म्हसणे (सुलतानपूर) येथिल स्वस्त धान्य दुकानाबाबत गावातील शंकर रेवजी तांबे यांनी केलेले, आरोप खोटे व निराधार असून घरगुती वैयक्तीक कारणामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे स्वस्त धान्य दुकानचालक रामचंद्र पठारे यांनी केले. दुकानाबाबत ग्रामस्थांची कोणतीही तक्रार नसून वैयक्तीक आकसापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. जनसेवा महिला बचत गटामार्फत हे दुकान आपण चालवत असून, अशा प्रकारे वारंवार तक्रारी होतात म्हणून, राजीनामा दिला आहे. दुसरे कोणी दुकान चालवत असेल तर आपली काहीही हरकत नसल्याचेही रामचंद्र पठारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तहसिलदारांच्या आशिर्वादाने म्हसणे स्वस्त धान्य दुकान गावाबाहेर, अनेक तक्रारी करून देखील ग्रामस्थांना मिळेना न्याय या मथळ्याखाली दैनिक लोकमंथनमधून वृत्त प्रसिद्ध होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान म्हसणे येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करणार असून, दोषी आढळ्यास कारवाई करणार असल्याचे पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांनी सांगितले. याबाबत म्हसणे सुलतानपूरच्या सरपंच सुनिता गुंड यांनी प्रसिद्धी पत्रक काढून, त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 14 ऑगष्ट 2017 रोजी ग्रामसभेमध्ये सुलतानपूर रेशन दुकान गावात आणण्यासंदर्भात ग्रामपंचायतचा ठराव करण्यात आला. कारण सदर रेशन दुकानावर सतत तक्रारी होत असल्या कारणाने दुकानदार हे दुकान चालविण्यास तयार नव्हते. त्यांनी जर दुकान न चालविल्यास दुसर्‍या गावी जोडले जाईल व त्यामुळे ग्रामस्थांना धान्य आणण्यासाठी बाहेरगावी जावे लागेल. ग्रामस्थांची गैरसोय व अडचण लक्षात घेता महिला ग्रामसभेमध्ये दि.1 ऑक्टो. 2017 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सदर दुकान हे आहे, त्याठिकाणी राहावे असा ठराव करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पुर्वी सुलतानपूर या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान होते. या ठिकाणी 60 रेशनकार्डधारक आहेत. म्हसणे येथे 203 रेशनकार्ड धारक असल्याने हे स्वस्त धान्य दुकान म्हसणे येथे जोडण्यात आले. या ठिकाणी सर्वांना धान्याच्या पावत्या दिल्या जात असून ग्रामस्थांची कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे म्हसणेच्या सरपंच सुनिता गुंड यांनी सांगितले.

म्हसणे सुलतानपूर येथील स्वस्त धान्य दुकान आहे, त्या जागी चालविण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव दिलेला आहे. तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकान ऑनलाईन जोडले गेले असून, कुटुंबातील प्रत्येकाचे आधार लिंक करण्यात आले आहे. ऑनलाईन असल्याने भ्रष्टाचाराचा संबंध येत नाही, तरीही आम्ही चौकशी असून दोषी आढळ्यास कारवाई करणार असल्याचे तहसिलदार भारती सागरे यांनी सांगितले.